नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला असून त्याची तयारी म्हणून काल देशभरात राष्ट्रीय दौड कार्यक्रम आखला. देशातल्या ११०० ठिकाणी हा दौडीचा कार्यक्रम पार पडला. त्यात विविध ठिकाणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह लाखो कार्यकर्ते आणि तरुण सहभागी झाले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वडोदरा येथे तिथल्या दौडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. हा दौडीचा कार्यक्रम देशाची एकता साधण्यासाठी आयोजित करण्यात आला असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या हस्ते दौड सुरू करण्यात आली. त्यांनी या प्रसंगी बोलताना, युवकांनी देशाच्या उद्धारासाठी संघटित व्हावे असे आवाहन केले. कोलकत्ता येथे स्मृती इराणी यांच्या हस्ते दौडीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
कॉंग्रेसने मात्र या दौडीवर टीका केली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी असे कार्यक्रम आखणार्या भाजपानेच देशात दुहीची बिजे पेरली आहेत असे पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी म्हटले.