कुनू (द. आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता व वंशवर्चस्वविरोधी लढ्याचे प्रणेते नेल्सन मंडेला यांना रविवार दि. १५ रोजी अत्यंत शोकाकूल वातावरणात जगाने अखेरचा निरोप दिला, अन् आफ्रिकेसह संपूर्ण जग हेलावून गेले. ‘थँक यू मडिबा ! गुडबाय मडिबा !!’ अशा शब्दात दक्षिण आफ्रिकेतील पाच कोटी जनतेच्या या लाडक्या महानायकाला जगाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ईस्टर्न केपमधील कुनू या त्यांच्या मूळ गावी इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांच्यासह जगभरातील विविध राष्ट्रांचे अध्यक्ष, प्रतिनिधी आणि जनतेच्या उपस्थितीत शाही इतमामात हा अंत्यसंस्कार सोहळा पार पडला.
जोहान्सबर्ग या दक्षिण आफ्रिकेच्या राजधानीपासून ७०० कि.मी. अंतरावर नेल्सन मंडेला यांचे कुनू हे जन्म गाव आहे. मदिबा या लाडक्या नावाने मंडेला यांना पुकारले जायचे. कुनू येथे त्यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर येथील रहिवाशांनी ‘प्रदीर्घ जीवनकाळ आणि आजारपणानंतर मदिबा येथे विश्रांती घेतील’ अशी आदरांजली या महानायकाला वाहिली. जगभरातून सुमारे ४५०० प्रतिनिधी या अंत्यसंस्कार सोहळ्याला उपस्थित होते. २१ तोफांची सलामी या महानेत्यास दिली गेली. अंत्यसंस्कार मंडेला कुटुंबियांच्या मर्जीनुसार त्यांच्या वडिलोपार्जित जागेत झाले.
इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी महाराणी एलिझाबेथ यांचा शोकसंदेश मंडेला परिवारास देण्याकरिता आणला होता. अनेक वक्त्यांच्या शोकसंदेशानंतर दफनभूमीकडे मंडेला यांच्या पार्थिवाचा प्रवास सुरू झाला. ज्या ठिकाणी हे अंत्यसंस्कार होणार होते तेथे केवळ ४५० जणांनाच आत येण्यास संधी होती. उर्वरित ४१०० मान्यवरांनी बाहेर टीव्ही स्क्रीनवर हा सोहळा अनुभवला.
२० व्या शतकातील महानायक नेल्सन मंडेला यांचे ९५ व्या वर्षी ५ डिसेंबर २०१३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. दक्षिण आफ्रिकेचे ते पहिले कृष्णवंशीय राष्ट्राध्यक्ष होते. मंडेला यांना १९९३ मध्ये शांततेसाठीच्या नोबेल पारितोषकाने सन्मानित करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर अत्यंत प्रभाव होता. भारताने त्यांना भारतरत्न म्हणून सन्मानित केले होते. मंडेला यांनी २००४ मध्ये सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती. २०१० मध्ये जागतिक फुटबॉल चषकाच्या निमित्ताने जोहान्सबर्ग येथील स्टेडियममध्ये त्यांनी शेवटचे जाहीर दर्शन दिले. हात उंचावून त्यांनी आपल्या लाडक्या जनतेला अभिवादन केले होते.