डाटाविंडचा स्मार्टफोन अवघ्या पाच हजारात उपलब्ध

मुंबई -भारतातील लो कॉस्ट टॅब्लेट आकाश ची निर्मिती करणारे डाटाविंड यांनी आता पॉकेट सर्फर पाच नावाने तीन स्मार्टफोनची सिरीज भारतीय बाजारात आणली आहे. या सिरीजसह डाटाविंडने स्मार्टफोन बाजारात पदार्पण केले आहे. पाच इंचाचा टचस्क्रीन असलेल्या या तीन पैकी दोन स्मार्टफोन ग्राहकांना पाच हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार आहेत. हे स्मार्टफोन डुअल सिम, अँड्राईड ऑपरेटिग सिस्टीम, फ्रंट कॅमेर्‍यासह आहेत.

या विषयी माहिती देताना कंपनीचे सीइओ सुनीतसिंग म्हणाले की आज बाजारात जो स्वस्तातला स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध आहे त्यापैक्षाही आमच्या फोनची किमत ४० टक्के कमी आहे. याचे कारण म्हणजे आम्ही स्वतःच टचस्क्रीन आमच्या अमृतसर व माँट्रीयल येथील कारखान्यांत बनवितो, त्यामुळे तेथेच आमची ५० ते ६० टक्के बचत होते. यामुळे आमचे स्मार्टफोन या किमतीत विकणे आम्हाला शक्य होत आहे. सुरवातीला हे फोन ऑनलाईन विकले जाणार असून नंतर कंपनी सेल्यूलर ऑपरेटरशी टायअप करणार आहे.

टॅब्लेट क्षेत्रात पदार्पण केल्यापासून म्हणजे एप्रिल २०१२ पासून कंपनीने आत्तापर्यंत १० लाख टॅब्लेट विकले आहेत. स्मार्टफोनच्या संदर्भात दरमहा ८०हजार ते १ लाख स्मार्टफोन विक्रीचे उदिष्ट ठेवले गेले आहे असेही सिंग यांनी सांगितले.

Leave a Comment