समलिंगी संबंध अनैसर्गिकच : राजनाथसिंग

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचा समलिंगी संबंधाबाबतचा वादग्रस्त निर्णय जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पार्टीने यावर मौन पाळले होते. ते मौन काल सोडले. भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठींबा दिला. समलिंगी संबंध हे अनैसर्गिकच असतात आणि त्याला पाठींबा देणे योग्य नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

समलिंगी संबंध हे अनैसर्गिकच असतात आणि अशा अनैसर्गिक कृत्याला मान्यता देण्यास भारतीय जनता पार्टी तयार नाही. अशा कृत्यांसाठी प्रसंगी जन्मठेपेची सुद्धा शिक्षा देण्याची तरतूद असलेल्या भारतीय दंडविधान संहितेच्या ३७७ व्या कलमाला भाजपा पाठींबा देईल, असे राजनाथसिंग म्हणाले. हे कलम निष्प्रभ करण्यासाठी कोणी प्रयत्न केल्यास भाजपा त्याला विरोध करील, असे त्यांनी जाहीर केले.

समलिंगी संबंध हे गुन्हा या सदरात मोडता कामा नयेत आणि त्यांना वैधता मिळावी यासाठी सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला असून ३७७ वे कलम रद्द करण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करील असे त्यांनी जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. राजनाथसिंग यांचे हे निवेदन राजकीय दृष्ट्या महत्वाचे समजले जात आहे.