वॉशिंग्टन – लोकसभेची आगामी निवडणूक पुढच्या वर्षी घेतली जाईल आणि १ जून रोजी भारताची सोळावी लोकसभा अस्तित्वात येईल, ही निवडणूक अनेक टप्प्यात घेतली जाईल असे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी काल अमेरिकेत एका समारंभात बोलताना जाहीर केले. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ही निवडणूक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पडेल, असा विश्वास डॉ. संपत यांनी व्यक्त केला.
ही लोकसभा निवडणूक ६ किंवा ७ टप्प्यांत होईल असे ते म्हणाले. ब्रुकिंग इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ते बोलत होते. या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. यावेळी भारतातल्या ७८ कोटी मतदारांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. ते मतदार आठ लाख मतदान केंद्रांवर आपला हक्क बजावतील. या निवडणुकीत ११ लाख ८० हजार मतदान केंद्रे वापरली जातील.
निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीचा कालावधी नेमकेपणाने सांगितला नाही, परंतु मार्च महिन्याच्या मध्यास निवडणुकीच्या तयारीला अंतिम स्वरूप येईल, असे ते म्हणाले. लोकसभेचे ५४३ सदस्य निवडले जातील अशी माहिती त्यांनी दिली.
भारतातल्या निवडणुकीचे वेळापत्रक कधीही चुकलेले नाही. पंधराव्या लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. त्यामुळे त्याच्या पूर्वी निवडणुका घेऊन १ जून रोजी नवी लोकसभा अस्तित्वात येईल आणि या गोष्टी वेळेवर पार पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.