कथाहीन ‘जॅकपॉट’

बॉलिवूडमध्ये असे काही दिग्दर्शक आहेत त्यांनी कोणत्याही कलाकाराला घेऊन चित्रपट तयार केला तरी तो फ्लॉप होतो. याचे कारण असते दिग्दर्शकाचा कच्चा गृहपाठ. असाच एक दिग्दर्शक म्हणून कैजाद गुस्ताद याची ओळख निर्माण झाली आहे. कॅटरिना कैफला ‘बूम’मधून त्याने बॉलिवूडमध्ये आणले. अमिताभ बच्चन ‘बूम’मध्ये असतानाही चित्रपट दणकून आपटला. जॅकपॉटच्या बाबतीत हेच आहे. नसिरुद्दीन शहासारखा मातब्बर कलावंत, सनी लियोन सारखी मदनिका जवळ असतानाही हा ‘जॅकपॉट’ प्रेक्षकांना भावत नाही.

जॅकपॉटची कथा गोव्यात घडते, तेथील केसीनो भोवती फिरते. बॉस (नसिरुद्दीन शहा) हा एका कॅसिनोचा मालक आहे. तेथे माया (सनी लियोन) आणि फ्रान्सिस (सचिन जोशी) हे जुगार खेळायला येत असतात, ते मोठे पंटर आहेत. आपल्या साथीदारांसह ते बॉसला गंडवण्याचा जुगार हाती घेतात. गोव्यात डिस्ने वर्ल्ड उभे करण्यासाठी 250 एकर जागा असल्याचे भासवून ते बॉसला 10 कोटींचा सौदा करण्याच्या जाळ्यात ओढतात. मग फ्रान्सिस सारी बनावट पात्रे बॉसच्या भोवती उभी करतो. बॉस आपल्या कॅसिनोतर्फे 5 कोटींचा जॅकपॉट जाहीर करतो. माया आणि फ्रान्सिसचा खेळाडू जॅकपॉट जिंकतो. मात्र ती बॅग बक्षीस समारंभातच बॉसच्या समोरून फ्रान्सिस पळवतो. मात्र त्याने पळवलेली बॅग रिकामी आहे, मग त्यातील पैसा गेला कुठे याभोवती जॅकपॉटची कथा फिरते. शेवट अपेक्षित असल्या प्रमाणे घडतो.

जॅकपॉट भोवती फिरणारी चित्रपटाची पटकथा आहे. मात्र मूळ कथा असायला हवी ती या चित्रपटाला नाही. त्यामुळे पटकथेवर एखादा दिग्दर्शक किती काम करणार हा प्रश्‍नच आहे. बी ग्रेड चित्रपटात असतात तसे संवाद जॅकपॉटमध्ये आहेत. कथा नसल्याने व्यक्तीरेखांची मांडणीही योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही. निव्वळ भंकसगिरी करणारी पात्रे पडद्यावर धुमाकूळ घालतात. तुकड्या-तुकड्यात चित्रपट कधी फ्लॅशबॅक तर कधी वर्तमानात चालतो. कथा नाही तर नाही निदान सनी लियोन आणि गोवा दर्शन घडवले असते तरी चालले असते. मात्र दिग्दर्शकाने त्याचीही तसदी घेतली नाही.

मायाच्या भूमिकेत असलेली सनी लियोन अभिनय सोडून बाकी सर्व काम चोख बजावते. तिच्या चेहर्‍यावरची रेषासुद्धा हललेली नाही. सचिन जोशीचे यापूर्वीचे दोन चित्रपटही फारसे प्रभावी नव्हते. तयामुळे त्याच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या आणि सचिन इथेही अभिनय करण्याचा प्रयत्न करत नाही. नसिरुद्दीन शहासारख्या कलावंताने अशा चित्रपटात का काम करावे? असा प्रश्न चित्रपट पाहताना सतत पडतो. मकरंद देशपांडे हा आणखी एक हुकुमी एक्का दिग्दर्शकाने वाया घालवला आहे. ‘कभी जो बादल बरसे’ हे गाणे चांगले आहे, ही त्यातल्या त्यात जमेची बाब. बाकी सगळी बोंबाबोबच आहे. यामुळे या जॅकपॉटच्या फंदात न पडलेले अधिक उत्तम.

चित्रपट – जॅकपॉट
निर्माती – : रैना सचिन जोशी
दिग्दर्शक – कैजाद गुस्ताद
संगीत – शारीब-तोशी
कलाकार – सनी लियोन, सचिन जोशी, नसीरुद्दीन शाह, भरत निवास

रेटिंग – *

Leave a Comment