अजूनही मनुष्यबळी

महाराष्ट्राच्या विधीमंडळात अंधश्रध्दा विरोधी किंवा जादूटोणा विरोधी कायदा करावा याबाबत बरीच चर्चा झाली. त्या चर्चेतल्या सगळ्या मुद्यांचा आता परामर्ष घेण्यात अर्थ नाही. कारण तो कायदा आता झाला आहे. परंतु या कायद्याची या समाजाला किती आवश्यकता आहे. हे पदोपदी जाणवत असते. देवाधर्माच्या नावावर चालणारा अनाचार, निरर्थक कर्मकांड आणि काही लोकांचे पोट भरावे म्हणून या कर्मकांडाला दिले जाणारे प्रोत्साहन याचे दर्शन आपण नित्यच घेत असतो. मात्र या २१ व्या शतकामध्ये अजूनही आपल्या संसारातल्या अडचणी दूर होण्यासाठी एका माणसाचा बळी दिला पाहिजे असा विचार करणारे लोक आहेत आणि त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी अशा कडक कायद्यांची गरज आहेच. मात्र असा कायदा करून समाज बदलतो का असा प्रश्‍न काही लोक उपस्थित करत असतात. त्यांच्या प्रश्‍नात तथ्य आहे. कारण समाज बदलण्यासाठी केलेले अनेक कायदे केवळ कायदे म्हणून कागदावर राहिलेले आहेत. आपल्या देशात एका बाजूला हुंडा विरोधी कायदा आहे तर दुसर्‍या बाजूला हुंड्यांची देवाणघेवाण करून सर्रास विवाह होत आहेत. या देशामध्ये हुंडा न देता किंवा घेता झालेला विवाह हा अपवाद समजावा इतकी हुंड्याची रूढी भक्कम आहे. पण या देशात गेल्या ६५ वर्षात एकही नवरदेव हुंडा घेतल्याबद्दल तुरूंगात गेलेला नाही.

म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा केवळ कागदावर आणि कायद्याच्या पुस्तकात उतरवलेला आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी नाही. त्याचाच दाखला देऊन लोक आता. अंधश्रध्दा विरोधी विधेयकाकडे बघायला लागले आहेत आणि हा कायदासुध्दा निव्वळ कागदावर राहून जाईल, समाजातल्या अंधश्रध्दा मात्र आहे तशा जारी राहतील. असे बोलले जात आहे. अशा विधेयकांनी समाजातली अंधश्रध्दा दूर होणार की नाही यावर वितंडवाद घालत बसण्यापेक्षा प्रत्यकाने आपल्या परिसरातली अंधश्रध्दा पसरवणारी मंडळी शोधून काढली पाहिजे आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले पाहिजे. आपल्या समाजामध्ये भगवे कपडे घालून लोकांना फसवणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. गंडे, ताईत, मंत्र, यंत्र, अंगारा, तीर्थ आणि प्रसाद यांच्या सेवनाने किंवा वापरण्याने व्यवहारातल्या अडचणी दूर होतील असे आमिष दाखवून लोकांकडून पैसा उकळणारे बाबा आणि साधू गल्लोगल्ली पसरलेले आहेत. तेव्हा आपल्या नजरेस असा बाबा पडल्यास त्याच्यावर या कायद्याचा बडगा उगारला जाईल. हे जागरूक नागरिकांनी बघितले पाहिजे.

अशाच एका मांत्रिकाने वसईमध्ये एका बाईचा बळी घेतला. एका रिक्षाचालकाची त्याच्या पत्नीशी होणारी भांडणे कायमची मिटावीत यासाठी या त्रयस्थ बाईचा बळी घेतला गेला आहे. कोंबडा किंवा बकर्‍याचा बळी देण्यापेक्षा बाईचा बळी दिला तर पती-पत्नीमधला बेबनाव कमी होईल असा सल्ला या रिक्षाचालकाला एका मांत्रिकाने सुचविला आणि त्यानेच तो अंमलात आणला. हा मांत्रिक वरकरणी तरी तो अशी कामे करू शकेल असे कोणालाही वाटणार नाही कारण तो एअर इंडियात नोकरी करतो. तो मांत्रिक आहे हे या वस्तीतल्या लोकांना माहीत असणार. मग तो एवढा प्रसिद्ध होता तर आजवर त्याचा बंदोबस्त का झाला नाही ? या मांत्रिकाने यापूर्वी असे बळीचे एक काम केले होते. शिवाय आता या प्रकरणात ज्या बाईचा बळी दिला गेला आहे ती बाई आपल्या मुलाची प्रकृती सुधारावी यासाठी असाच काही तरी विधी करून किंवा कशाचा तरी बळी देऊन देवांना प्रसन्न करून घ्यावी म्हणूनच या मांत्रिकाकडे आलेली होती. तिला तिच्या मुलासाठीच एक विधी करायचा आहे असे सांगून एकांत स्थळी नेले आणि तिचाच बळी दिला. या सगळ्या हकिकतीवरून एवढे तरी नक्कीच कळते की या परिसरात मनुष्यबळी किंवा प्राण्यांंचे बळी देऊन माणसाच्या शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर केल्या जातात हे सर्वांना माहीत होते. कोणाला काही आजार झाला की साहजिकच त्याला डॉक्टरकडे नेले जाते.

काही वेळा डॉक्टरांना रोगाचे नीट निदान होत नाही किंवा बनावट औषधे मिळतात किंेवा पेशंट पथ्ये पाळत नाही अशावेळा आजार बळावतो किंवा मानसिक समस्या असल्यास ती औषधाने सुटत नाही. मग आसपासचे लोक मांत्रिकाचा सल्ला घेतात. हा आजार नसून भूतबाधा आहे असा सर्वांचा समज होतो आणि मग मांत्रिकाला शरण जातात. तो असे अघोरी उपाय योजितो. असे प्रकार खेड्यांत मोठया प्रमाणावर होत असतात कारण तिथे डॉक्टरांची सेवाच उपलब्ध नसतात. तिथल्या लोकांना शहरात जाऊन इलाज करणे शक्य होत नाही. ते मुळात उपचार करण्याबाबतच उदासीन असतात पण गावातल्या गावात मांत्रिकाच्या उपचाराने आजार बरा झाला तर ठीकच आहे असे म्हणून पेशंटला या मांत्रिकाच्या हवाली केले जाते. त्याने पेशंट कधीच नीट होत नाही. खरे तर भूत नावाची काही चीज अस्तित्वात नसते हेच लोकांना कळत नाही. पण अशा समजुतींमुळेच लोक अशा अघोरी उपायांना बळी पडत असतात. ग्रामीण भागात डॉक्टरचे दर्शनच दुरापास्त असते त्यामुळे लोकांनी काही पर्यायी उपचार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामागची त्यांची अडचण आपण ओळखू शकतो पण वसईतल्या ज्या गावात हा बळी दिला गेला आहे त्या गावात काही डॉक्टर दुर्मिळ नव्हता. मग हे लोक अघोरी प्रकाराच्या मागे कसे गेले हा प्रश्‍न पडतो. याचा अर्थ असा होतो समाजपरिवर्तनासाठी कायद्याची तर गरज आहेच पण कायद्याबरोबर समाज प्रबोधनाचे प्रयत्नही समांतरपणे झाले पाहिजेत.