लंडन – ब्रिटनच्या शाही घराण्याचा उत्तराधिकारी प्रिन्स हॅरी याने दक्षिण ध्रुवावर पाय रोवून ब्रिटनचा झेंडा फडकविला आहे. अफगाणिस्तान आणि इराक युद्धात जखमी झालेल्या माजी सैनिकांच्या चमूसह हॅरीने शुक्रवारी दुपारी दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले असे समजते. अशी कामगिरी करणारा ब्रिटनच्या राजघराण्याचा तो पहिलाच सदस्य आहे.
अंटार्टिका महाद्वीपातून तीन आठवड्यांपेक्षाही अधिक काळ खडतर प्रवास या जगातल्या दुर्गम भागात पोहोचण्यासाठी या चमूला करावा लागला. -वॉकींग वुइथ द वुंडेड- या नावाने ही मोहिम आखली गेली आहे. या मोहिमेत ब्रिटनबरोबरच अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील १२ माजी सैनिक सहभागी झाले आहेत. ३२० किमीच्या या प्रवासात या चमूला उणे ३५ अंश सेल्सिअस तापमानाचा तसेच ९० किमी प्रति घंटा वाहणार्या बोचर्याल वार्याचा सामना करावा लागला.
यापूर्वी २०११ सालात हॅरीने उत्तर ध्रुवावरच्या मोहिमेतही भाग घेतला होता. मात्र त्यावेळी त्याचा भाऊ प्रिन्स विल्यम्स आणि केट यांच्या लग्नासाठी ही मोहिम त्याला अर्धवट सोडून परतावे लागले होते असेही समजते.