बिठूर गांव – ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार

कानपूरपासून केवळ २२ किमीवर असलेले, गंगाकिनारी वसलेले छोटेसे गांव बिठूर हे भारताच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार असलेले छोटेसे गांव आहे. अगदी टुमदार अशा या गावाचे उल्लेख भारताच्या प्राचीन काळापासून येतात. अनेक ऐतिहासिक घटना येथे घडल्या आहेत असे सांगितले जाते.

kanpur

(फोटो सौजन्य – Patrika)
या एवढ्याशा गावांने काय काय अनुभवले याची यादी वाचली तर थक्क व्हायला होते. रामाने सीतेचा त्याग केला तो इथेच. वाल्ह्याचा वाल्मिकी झाला तो याच गावात. इथेच वाल्मिकींनी तपश्चर्या करून रामायणाची रचना केली. १८५७ च्या बंडाचे प्रमुख केंद्र हेच होते. इतकेच नव्हे तर ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना येथेच केली आणि त्यानंतर अश्वमेध यज्ञही केला. याची खूण म्हणून ब्रह्मदेवाने घोड्याच्या नालेची स्थापना केली असेही सांगितले जाते. ब्रिटीशानी भारताचा ताबा घेतल्यानंतर शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव येथेच राहिला आणि पेशवा आल्यापासून या गावाने नवा अध्याय लिहिला. १८५७ च्या बंडातले प्रमुख मोहरे नानाराव, तात्या टोपे येथेलेच. आजही टोपे परिवाराचे सदस्य येथे राहतात.
kanpur1
ब्रिटीशांची प्राणपणाने लढणारी आणि मेरी झाँसी नहीं दूंगी म्हणणारी राणी लक्ष्मीबाई, हिचे बालपण याच गांवात गेले. ५२ घाटांची नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या गावात आजमितीस केवळ २९ घाट शिल्लक आहेत. सीतामाईने पुत्र लव आणि कुश यांना ज्या आश्रमात जन्म दिला तो वाल्मिकी ऋषींचा आश्रम थोडा उंचावर असलेल्या टेकडीवर आहे. अतिशय पवित्र असा ब्रह्मावर्त घाट आणि लाल दगडांत बांधलेला पाथरघाट ही येथली आणखी कांही वैशिष्ठ्ये.

इतक्यावरच या गावाचा महिमा थांबत नाही. पाथर घाटावर असलेले भव्य शिवमंदिर आवर्जून पाहावे असेच. या मंदिरातील शिवलिंग कसोटीच्या दगडापासून बनविले गेले आहे. कसोटीचा दगड म्हणजे सोन्याच्या कसाची परिक्षा करणारा दगड. ध्रुव टीला येथेही भेट द्यावीच. कारण येथेच ध्रुवाने घोर तपश्चर्या करून अढळस्थानाची प्राप्ती करून घेतली असेही सांगितले जाते.

Leave a Comment