लखनौमधून मोदींविरोधात लढणार केजरीवाल?

आगामी लोकसभा निवडणूकांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि लोकप्रिय नेते म्हणून उदयास आलेले नरेंद्र मोदी लखनौ अथवा वाराणसी येथून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. याचवेळी पहिल्याच प्रयत्नात दिल्ली विधानसभा निवडणूकांत नेत्रदिपक यश मिळविल्यानंतर लोकसभा निवडणकांत उतरणार असल्याची घोषणा आम आदमी पार्टीने केली आहे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केल्यानंतर आत्मविश्वास मिळालेल्या अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधातच निवडणूक लढविण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे.

या निमित्ताने आम आदमी पक्ष केवळ दिल्लीपुरताच मर्यादित नाही तर देशभर तो निवडणुकांत उतरेल असे संकेत दिले जात आहेत. दिल्लीतील विजयानंतर केवळ ७२ तासांत १ लाख लोकांनी पक्ष सदस्यत्व घेतल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी राष्ट्रीय पातळीवरही बड्या नेत्याला टक्कर देऊन त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. यातूनच मोदींच्याच विरोधात केजरीवाल दंड थोपटणार आहेत. या लढतीमुळे आप पक्षाला संजीवनी मिळेल असेही सांगितले जात आहे. शिवाय केजरीवाल एका झटक्यात राष्ट्रीय पातळीवरचे नेते बनणार आहेत.

या दुसरा फायदा असाही दिसतो आहे की केजरीवाल यांना त्यांच्या प्रचारासाठी फारसे परिश्रम घेण्याची आवश्यकता पडणार नाही. कारण प्रसारमाध्यमेच मोदींबरोबर केजरीवाल यांनाही कव्हरेज देणार हे निश्चित आहे. परिणामी मोदी विरूद्द राहुल चर्चा थांबून मोदींविरूद्ध केजरीवाल अशी चर्चा झडत राहील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment