वॉशिंग्टन – ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार २००२ ते २०११ या काळात परदेशात काळा पैसा पाठविणार्या देशांत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. या काळात ३४३.०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा अनेक देशांनी परदेशातील बँकात पाठविला असून २०११ या सालात केवळ भारतातून ८४.९३ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात पाठविला गेला. इल्लिसिट फायनान्शियल फ्लोज फ्रॉम डेव्हलपिग कंट्रीज २००२-११ अशा नावाखाली हे सर्वेक्षण केले गेले आहे.
या अहवालानुसार विकसनशील देशात २०११ मध्ये गुन्हेगारी, भ्रष्टाचार, करचुकवेगिरी या प्रकरणातून निर्माण झालेला ९४६.७ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात पाठविला गेला तर २००२ ते ११ या काळातील ही रक्कम तब्बल ५९०० अब्ज डॉलर्स इतकी आहे. सर्वेक्षण करणार्यां संस्थेचे अध्यक्ष रेमंड बेकर सांगतात या काळात जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत झालेली असताना जगभरातच काळा पैसा मात्र तुफान वेगाने वाढत होता. त्यात विकसनशील देश आघाडीवर होते.२०११ मध्ये गरीब समजल्या जाणार्या देशांनीच किमान १ हजार अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात पाठविला. अशा १५ देशांच्या यादीत आशियातील ६ देश आहेत. त्यात चीन प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर मलेशिया, भारत, इंडोनेशिया, थायलंड आणि फिलिपिन्सचा समावेश आहे.
जागतिक यादीत चीन १०८० अब्ज डॉलर्स, रशिया ८८०.९६, मेक्सिको ४६१.८६, मलेशिया ३७०.३८ व त्यानंतर भारत ३४३.०४ अब्ज डॉलर्स असे क्रमांक आहेत.