मनसे म्हणजे समाजवादी गांडूळ- उद्धव

मुंबई – आयएनएस विक्रांतच्या संवर्धनाबाबत मनसेच्या भूमिकेवर शिवसेनेने जहाल टीका केली आहे. मनसे म्हणजे समाजवादी गांडूळ असल्याचे शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

मुंबई महापालिकेने आयएनएस विक्रांतच्या संवर्धनासाठी मदत करण्याची घोषणा केली. त्यानंतर मनसेने त्यावर आक्षेप घेतला, मात्र अवघ्या २४ तासांच्या आत घुमजाव केले. पण शिवसेनेने मनसेच्या भूमिकेवर शरसंधान साधण्याची संधी सोडली नाही. समाजवादी गांडुळांनी मुंबई महानगरपालिकेत जन्म घेतला आहे की काय अशी शंका मनसे नामक पक्षाची वळवळ पाहून आली.

विक्रांतसाठी पालिकेचा पैसा कशासाठी? मनसेची ही बेडुकछाप डराव डराव भूमिका म्हणजे देशासाठी लढणार्याव आणि शहीद होणार्या सैनिकांचा अपमान आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे. मुंबई आणि मुंबईकरांचे रक्षण विक्रांतने केले आहे. तेव्हा आता या युद्धनौकेचे रक्षण मुंबईकरांच्या पैशाने झाले तर त्यात बोभाटा करण्यासारखे काय आहे, असा सवाल सेनेने विचारला आहे.

विक्रांत वाचवण्यापेक्षा मुंबईतील खड्डे बुजवा, असे मनसे म्हणत आहे. त्यांनी आधी नाशिकचे खड्डे बुजवावे, मग दुसर्यां च्या खड्‌ड्यांमध्ये उड्या माराव्या असे परखड शब्दात मनसेला सुनावले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, विक्रांत युद्धस्मारकाला जे विरोध करतील तेच भंगारात जातील. रस्ते होतील, खड्डे बुजवले जातील पण विक्रांत भंगारात काढली तर इतिहास माफ करणार नाही. ज्यांना गल्लीत कोणी विचारत नाही, त्यांनी असे तारे तोडावेत, यालाच समाजवादी वळवळ म्हणतात. चला या निमित्ताने एक दिसले, मुंबईत प्रजा समाजवादी गांडुळांनी नवा अवतार घेतला आहे.’, असेही नमूद केले आहे.

Leave a Comment