निवडणुकांतील यश मुख्यमंत्री यांच्यामुळे- आडवाणी

नवी दिल्ली – नुकत्याच चार राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत विजयाचे श्रेय भाजपने नरेंद्र मोदींना दिले आहे. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मात्र या विजयाचे श्रेय त्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यातील नेत्यांना दिले आहे. त्यामुळे अडवाणी यांचा अजूनही नरेंद्र मोदी यांच्याविषयी असलेला राग कमी झालेला दिसत नाही. त्यांच्या या विधानामुळे भाजपात खळबळ माजली आहे.

यावेळी बोलताना अडवाणींनी मोदींचा उल्लेखही न केल्याने अडवाणींचा मोदीविरोध पुन्हा एकदा दिसून आला. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला. या यशानंतर भाजपच्या पक्षाध्यक्षांसह जवळपास सर्वच नेत्यांनी या विजयात नरेंद्र मोदींचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत मोदींचे भरभरुन कौतुक केले.

याबाबत काही जणांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांना या विजयाचे श्रेय कुणाचे असे विचारला असता ते म्हणाले, ‘त्या राज्यांमधील मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, पक्षाचे स्थानिक नेतृत्वामुळे हा विजय शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.’ मोदींना विजयाचे श्रेय द्याल का यावर अडवाणी म्हणतात, ‘निवडणुकीत पक्षातील सर्वांचे भूमिका महत्त्वाची असते. हा विजय टीम वर्कमुळेच मिळू शकतो. त्यामुळे एका व्यक्तीला विजयाचे श्रेय देता येत नाही.’ असे स्पष्ट करीत त्यांनी मोदी विरोध कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

Leave a Comment