नवी दिल्ली – कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळालेल्या दिल्ली विधानसभेत कॉंग्रेस पक्षाने आम आदमी पार्टीला पाठींबा देण्याची तयारी दर्शविली असली तरी आम आदमी पार्टीने हा पाठींबा नाकारला आहे. अशा परिस्थिती भाजपाचेही सरकार स्थापन होत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक होण्याची शक्यता वाढली आहे आणि म्हणून आपण पुन्हा निवडून येऊ की नाही, या शंकेने अस्वस्थ झालेल्या भाजपा आमदारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिले असून भाजपाने आम आदमी पार्टीच्या सरकारला बाहेरून पाठींबा द्यावा, अशी सूचना केली आहे.
दरम्यान, आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी भाजपाचाही पाठींबा नाकारला आहे. कॉंग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष भ्रष्ट असल्यामुळे या दोघांचाही पाठींबा घ्यायचा नाही, असा निर्धार ‘आप’ने केला आहे. मात्र कोणाचाही पाठींबा घेतल्याशिवाय सरकार स्थापनच होत नाही आणि भ्रष्टाचारापासून मुक्त असा कोणताच पक्ष या देशात नाही. एकंदरीत ‘आप’चे सरकार येण्याची शक्यता नाही.
आम आदमी पार्टीचा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, पण त्यांना स्वत:ला स्पष्ट बहुमत मिळाले तरच ते भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करून देशातला भ्रष्टाचार कमी करणार आहेत. अशा प्रकारची हटवादी भूमिका घेऊन आपण भ्रष्टाचार नष्ट करण्यास वचनबद्ध आहोत, असे आपचे नेते मानत असले तरी प्रत्यक्षात त्यांना सरकार स्थापन करण्याची आणि चालविण्याची जबाबदारी टाळायची आहे, असा आरोप कॉंग्रेसचे नेते हरुन युसूफ यांनी केला आहे.
आप पार्टीने निवडणूक प्रचाराच्या काळात उत्साहाच्या भरात अवाजवी आश्वासने दिलेली आहेत. आपण सत्तेवर आल्यास विजेचे दर ५० टक्क्याने कमी करू आणि दिल्लीतल्या जनतेला दर महिन्याला दरडोई ७०० लिटर पाणी देऊ अशी आश्वासने त्यांनी दिलेली आहेत. सत्तेवर येण्याच्या आधी अशी स्वप्ने दाखविणे सोपे असते, पण प्रत्यक्षात सरकार चालवताना ती सत्यात उतरवणे अवघड असते याची जाणीव आता अरविंद केजरीवाल यांना व्हायला लागली आहे आणि तिच्यातून पळ काढण्यासाठी ते सरकार स्थापनेची जबाबदारी टाळत आहेत, असे हरून युसूफ म्हणाले.