जगभरात मलेरियातून वाचले ३३ लाख प्राण

जिनेव्हा – मलेरियाच्या संकटाविरोधात २००० सालापासून जागतिक स्तरावर सतत सुरु असलेल्या उपाययोजनांमुळे सुमारे ३३ लाख प्राण वाचल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे. मात्र मलेरियाच्या संकटावर नियंत्रण मिळवून त्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या या मोहिमेत अजून बरेच काम करावयाचे बाकी असल्याचे संघटनेने सांगितले.

मलेरियावरील उपाययोजनेच्या मोहिमेस प्राप्त झालेल्या वाढत्या राजकीय व आर्थिक पाठिंब्यामुळे जागतिक स्तरावरील मलेरियाचे प्रमाण २९ टक्क्यांनी कमी झाल्याचे संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्याबरोबरच, आफ्रिका खंडामध्ये मलेरियाच्या प्रमाणामध्ये गेल्या बारा वर्षांमध्ये तब्बल ३१ टक्क्यांनी घट झाली आहे.

त्याचबरोबर, मलेरियामुळे मृत्यु होण्याच्या घटनांमध्येही जागतिक स्तरावर ४५; तर आफ्रिका खंडामध्ये ४९ टक्क्यांनी घट झाली आहे. मलेरियामुळे लहान मुलांचा मृत्य होण्याच्याआफ्रिकेमधील घटनांमध्ये तब्बल ५४ टक्क्यांची घट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार अजूनही जगातील सुमारे साडेतीन अब्ज लोकसंख्येस मलेरियाचे संकट भेडसावत असून आफ्रिका व दक्षिण पूर्व आशियामधील लोकसंख्येस हा धोका जास्त प्रमाणात आहे.

मलेरियाच्या येत्या दशकभरात(२०१६-२०२५) समूळ उच्चाटनासाठी जागतिक स्तरावर यंत्रणा उभी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्नशील आहे.

Leave a Comment