आयकर, विक्रीकर, सीमाशुल्क रद्द करण्याचा भाजपचा विचार

आगामी २०१४ लोकसभा निवडणुकांत भाजपकडून जे व्हीजन डॉक्युमेंट तयार केले जात आहे त्यात देशातील आयकर, विक्री कर आणि सीमाशुल्क रद्द करण्याचे आश्वासन दिले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वाखाली हे व्हिजन डॉक्युमेंट २०२५ तयार केले जात आहे.

नितीन गडकरी यांनीही आयकर व बाकी कर रद्द करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की या करातून सरकारला मिळणारा महसूल १४ लाख कोटी इतका आहे तर देशात सध्या दीड लाख बँक शाखा आहेत. या करांऐवजी पारदर्शकता सांभाळून ट्रान्झॅक्शन टॅक्स केवळ एक टक्का लावला गेला तरी महसूलाची रक्कम ४०,००० लाख कोटींवर जाईल असे तज्ञांचे मत आहे. तसेच बँक शाखांची संख्याही दीड लाखांवरून दहा लाखांवर जाईल. या संदर्भात आम्ही अनेक अर्थतज्ञांकडून सूचना मागविल्या आहेत व ते स्वतः ४०० ते ४५० तज्ञांना भेटलेही आहेत.

आयकर व अन्य कर रद्द करण्याबरोबरच चलनातून ५०० व १००० रूपयांचा नोटा रद्द कराव्यात अशीही सूचना आली आहे व त्यावरही विचार सुरू आहे असेही गडकरी यांनी सांगितले. हे व्हीजन डॉक्यमेंट येत्या महिन्याभरात आणले जाणार आहे. या संदर्भात आपले मत व्यक्त करताना भाजपत नुकतेच आलेले जनता दलाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले की देशाकडे साधनसंपत्तीची कमतरता नाही. परदेशी बँकात राजकारण्यांनी १२० लाख कोटींची संपत्ती दडविली आहे तर आयकरातून सरकारला केवळ २.५ लाख कोटी रूपये मिळत आहेत. आयकर रद्द झाला तर मध्यमवर्गीय हा पैसा बँकात ठेवतील व असा पैसा गुंतवणुकीसाठी उपलब्ध होऊ शकेल.

Leave a Comment