नंदन निलेकणी : कॉंग्रेसची हाराकिरी ठरणार

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे प्रतिस्पर्धी म्हणून कॉंग्रेसच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर केले जाईल, असे सोनिया गांधी यांनी सूचित केल्यामुळे नावांची चर्चा सुरू झाली आणि कॉंग्रेस पक्ष नंदन निलेकणी यांना उमेदवार म्हणून जाहीर करणार असे संकेत मिळायला लागले आहेत. कॉंग्रेसने त्यांचे नाव जाहीर केल्यास कॉंग्रेसची ती आत्महत्या ठरेल, असे स्पष्ट मत जनता दल (युनायटेड) पक्षाचे खासदार शिवानंद तिवारी यांनी व्यक्त केले.

श्री. नंदन निलेकणी हे आधार कार्ड देणार्‍या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ते इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे चेअरमन आहेत. त्यांचे नाव भारतातल्या इंग्रजी भाषा जाणणार्‍या काही निवडक व्यक्तींशिवाय कोणालाही माहीत नाही. अशा माणसाचे नाव पंतप्रधानपदाला पुढे करून कॉंग्रेसने आत्मघात करण्याचा निर्धारच केला आहे असे दिसते, असे तिवारी म्हणाले.

सोनिया गांधी यांनी नंदन निलेकणी यांचे नाव अजून जाहीर केलेले नाही. परंतु त्यांनी यासंबंधात बोलताना, ‘त्याचे’ नाव लवकरच जाहीर केले असे म्हटले. याचा अर्थ तो उमेदवार म्हणजे प्रियंका वड्रा या नाहीत असा होतो. कारण सोनिया गांधी यांच्या डोळ्यासमोर प्रियंकाचे नाव असते तर त्यांनी ‘तिचे’ नाव लवकरच जाहीर केले जाईल असे म्हटले असते. मात्र हा ‘तो’ कोण याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

नंदन निलेकणी हे लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बंगळूर साऊथ या कर्नाटकातल्या लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे तिकीट दिले जाणार आहे. या गोष्टी निश्‍चित आहेत. परंतु त्यांचे नाव सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून डोळ्यासमोर ठेवले असल्याचे अजून निश्‍चितपणे सांगण्यात आलेले नाही.

Leave a Comment