वैयक्तिक कामे होत नाहीत म्हणून राजीनामे : भोईर

पिंपरी-चिंचवड (पुणे) – पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत विलंब होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आल्याने संतापलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.

अवैध बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घाईगडबडीने घेता येत नसल्याची वस्तुस्थिती राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना ठाऊक आहे. तरीही उद्योगनगरीतील घरकुले नियमित करण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यासाठी ’मिस्टर क्लीन’ अशी प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्याऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेस नाहक त्यांच्यावर चिखलफेक करत आहे. हे आरोप जनहितासाठी नसून वैयक्तिक कामे होत नसल्याच्या रोषातून होत असल्याचा प्रतिहल्ला कॉंग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोमवारी झालेल्या पक्ष बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यात आला.

या बैठकीत अवैध बांधकाम नियमितीकरण, विकास आराखड्यातील वगळलेला भाग (ईपी), पूररेषा, नवनगर विकास प्राधिकरणाचा साडेबारा टक्के जमीन परतावा आदींसह महत्त्वाचे प्रश्न भिजत ठेवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरण्यात आलं. तसंच, मुख्यमंत्र्याच्या निषेधार्थ ४० नगरसेवकांनी महापौर मोहिनी लांडे यांच्याकडे नगरसेवकपदाचे राजीनामेही सादर केले.

केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस – राष्ट्रवादीचं आघाडी सरकार आहे. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे. तथापि, पिंपरी – चिंचवडमध्ये मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. कॉंग्रेसविरोधात विशेषत: मुख्यमंत्र्यांविरोधात वातावरण दूषित केलं जात आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राजकारण केले जात आहे, असा आरोप कॉंग्रेस शहराध्यक्षांनी केला.

Leave a Comment