मैसूरचे माजी संस्थानिक वडियार यांचे निधन

मैसूर – कर्नाटकातील मैसूर संस्थानचे शेवटचे वारस श्रीकांतदत्त नरसिंहराज वडियार यांचे काल मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६० वर्षे वयाचे श्रीकांतदत्त हे बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. बंगळूर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांना दुपारी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

मैसूर संस्थानचे संस्थानिक म्हणून काम केलेले जयचामराजेंद्र वडियार यांचे श्रीकांतदत्त हे एकुलते एक चिरंजीव होते. मैसूर संस्थानचा दसरा महोत्सव सार्‍या जगात प्रसिद्ध आहे आणि तो आपल्या पूर्वजांच्या इतक्याच दिमाखाने साजरा करण्याबाबत श्रीकांतदत्त हे दक्ष होते. श्रीकांतदत्त यांना संतती नाही. त्यामुळे त्यांच्या निधनाने वडियार राजवंश संपला आहे.

क्रिकेटची आवड असणारे श्रीकांतदत्त हे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांनी राजकारणातही सक्रिय सहभाग घेतलेला होता. कॉंग्रेसचे खासदार म्हणून ते चार वेळा निवडून सुद्धा आले होते. मात्र नंतर ते भाजपात गेले आणि भाजपाचे खासदार म्हणून निवडूनही आले. परंतु नंतरच्या दोन निवडणुकांत ते पराभूत झाले. उद्योग व्यवसायातही त्यांनी चांगली कामगिरी केली होती. मैसूरच्या सिल्कच्या साड्या जगात सुप्रसिद्ध करण्याच्या बाबतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

Leave a Comment