दिल्लीत पुन्हा निवडणुकांचा खर्च १३० कोटी

दिल्ली – दिल्लीत सत्तेवर कोण येणार याचे कोडे अद्यापही सुटले नसल्याने कांही काळ राष्ट्रपती राजवट व पुन्हा निवडणुका अशी परिस्थिती येण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या तर त्यासाठी किमान १३० कोटी रूपये खर्च होतील असा अंदाज मांडला गेला आहे.

निवडणुक आयोगालाच दिल्लीत पुन्हा निवडणुका घ्यायच्या झाल्या तर ७० ते ७५ कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. आत्ताच्या निवडणुकात आयोगाला ८० कोटी रूपये खर्च आला आहे. मात्र पुन्हा निवडणुका झाल्यास प्रशिक्षणावरचा खर्च होणार नसल्याने पाच कोटी रूपये कमी खर्च होईल असे निवडणूक आयोगाचे उपप्रमुख ए.के.श्रीवास्तव यांनी सांगितले.

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा आहेत. प्रत्येक जागी पाच उमेदवार धरले तर प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार १६ लाख रूपये खर्च करण्याची परवानगी आहे. म्हणजेच या ३५० उमेदवारांचा अधिकृत खर्च ५६ कोटी रूपये होईल. नुकत्याच झालेल्या निवडणुकांत भाजप आणि काँग्रेसने किमान १००-१०० कोटी रूपये खर्च केले असल्याचे सांगितले जात असून प्रत्येक उमेदवारामागे या पक्षांनी ६० लाख रूपये खर्च केले असावेत असे सांगितले जात आहे. शिवाय निवडणूक आयोगाला येणारा ७५ कोटी रूपयांचा खर्च लक्षात घेतला तर एकूण निवडणुकीचा खर्च १३० कोटी रूपयांच्या घरात जाणार आहे.

Leave a Comment