जनरल मोटर्सच्या प्रमुखपदी मारी बॅरा यांची निवड

जागतिक वाहन उत्पादक कंपनी जनरल मोटर्सने प्रथमच कंपनीच्या प्रमुखपदी महिलेची निवड केली असून ग्लोबल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या मारी बॅरा यांच्याकडे सीइओची सूत्रे पुढील महिन्यात सोपविली जाणार आहेत. त्या सध्याचे सीईओ डॅन अँकरसन यांची जागा घेणार आहेत. यू.एस. ट्रेझरीने जनरल मोटर्सचे शेअर्स संपूर्णपणे विकत असल्याची घोषणा केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला असून अँकरसन यांनी लगेचच १५ जानेवारीला निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे.

अँकरसन यांनी कंपनीचे सीईओ तसेच अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र पत्नीला कॅन्सर असल्याने गेले अनेक महिने त्यांनी पदावरून निवृत्त होण्याचे ठरविले होते. कंपनी बोर्डाने सीईओ पदी ५१ वर्षीय बॅरा यांची निवड केली असून त्या संचालकपदही भूषविणार आहेत. कंपनीचे अध्यक्षपद ६६ वर्षीय थिओडोर सोल्सो यांच्याकडे सूपूर्द केले जात आहे.

अँकरसन यांनी आपण जबाबदारीतून अतिशय समाधानाने मुक्त होत असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की कंपनीचे सारे निर्णय घेताना आम्ही ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवूनच घेतले आहेत. अमेरिकेला अभिमान वाटावा अशी आज कंपनीची स्थिती आहे आणि नवीन टीमही कंपनीची प्रगती अशीच कायम राखेल अशी अपेक्षा आहे.