नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणूक मे महिन्यातच होतील. निवडणूक आयोगाच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सर्व निवडणूक कार्यक्रम पार पडेल, असे केंद्रीय मंत्री कमल नाथ यांनी बुधवारी सांगितले.
लोकसभा निवडणूक मे महिन्यातच होणार : कमलनाथ
लोकसभा निवडणूक मार्च- एप्रिल महिन्यात होणार, तेलंगण मुद्दयावरुन खासदारांनी राजीनामे दिल्याने सरकार अल्पमतात, सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार, अशा प्रकारच्या अनेक वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही. टीडीपीच्या फक्त चार सदस्यांनी नोटीस मोशन बजावली आहे, त्यावर सभापती मिरा कुमार या निर्णय घेतील. सरकारकडे योग्य बहुमत आहे त्यामुळे सरकारला कोणतीही भीती नाही. अविश्वास ठराव आणला तरी सरकारवर कोणताही फरक पडणार नाही, सरकार स्थिर असल्याचा कमल नाथ यांनी खूलासा केला.
सरकार लवकर निवडणूका घेण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या येत आहेत. त्या बातम्या चुकीच्या असून सरकार आपला कार्यकाळ पू्र्ण करील आणि निवडणूक ठरल्याप्रमाणे मे महिन्यातच होईल, असे नाथ यांनी सांगितले. यापूर्वी २००४ आणि २००९ मध्ये अनुक्रमे एप्रिल आणि मे महिन्यात निवडणूक झाली होती. त्यामुळे यावेळीही निवडणूक ठरलेल्या वेळेतच होईल.