काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नंदन निलकेणी चर्चेत

दिल्ली – टेक्नोसेव्ही म्हणून ओळखले जाणारे व ‘आधार’ कार्ड योजना राबवणारे इन्फोसिसचे माजी सीईओ नंदन निलकेणी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याेची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तूळात रंगली आहे. टेक्नोसेव्ही म्हणून ओळखले जाणा-या निलकेणी यांची स्वच्छ प्रतिमा नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकेल असे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटत आहे. दुसरीकडे मात्र, निलकेणी यांनी मात्र पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्लीसह राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्लीत पराभवाचे विश्लेषण करताना लवकरच काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करु असे सांगितले. यानंतर काँग्रेसच्या गोटात पंतप्रधानपदाची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडेल यावर तर्क लढवले जात आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव या स्पर्धेत सर्वात पुढे आहे.आगामी काळात राहुल गांधींनी उमेदवारी नाकारल्यास अर्थमंत्री पी. चिदंबरम, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि संरक्षणमंत्री पी.के.अँटनी यांचे नावही चर्चेत आहे. मात्र या स्पर्धेत ५९ वर्षीय नंदन निलकेणी यांचे नावही आता समोर येऊ लागले आहे. इन्फोसिसचे माजी सीईओ आणि आधार कार्ड योजना राबवून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले नंदन निलेकणी हे येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण बंगळूर मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार आहेत. टेक्नोसेव्ही निलकेणी हे तरुणांमध्येही लोकप्रिय असून काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या तुलनेत ते तरुण आहेत. कठीण परिस्थितीत विविध राज्यांमध्ये विविध पक्षांसोबत काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे मोदींना आव्हान देण्यासाठी निलकेणी हे योग्य उमेदवार आहेत.