रमणसिंगांचा १२ डिसेंबरला शपथविधी

रायपूर – काँग्रेसबरोबर काँटे की टक्कर देऊन पुन्हा सलग तिसर्‍यांदा बहुमत मिळविण्यात यशस्वी झालेल्या छत्तीसगढमध्ये भाजपचे रमणसिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी १२ डिसेंबरला होणार आहे. रायपूर येथील पोलिस परेड ग्राऊंडवर सकाळी ११ वाजता हा शपथविधी समारंभ होत आहे आणि त्यासाठी भाजपमधील अनेक वरीष्ठ नेते हजेरी लावणार आहेत. रमणसिंग यांनीही मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक साधली आहे.  विशेष म्हणजे २००८ सालच्या विधानसभा निवडणुकांनंतर याच दिवशी रमणसिग यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतमोजणी झाल्यानंतर भाजपने ९० जागांपैकी ४९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत रमरणसिंग यांची नेते म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली. त्यानंतर रमणसिंग यांनी राजभवनावर जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतानाच त्यांनी भाजपचे वरीष्ठ नेते आणि पक्ष कार्यकर्ते यांना धन्यवादही दिले.

रमणसिंग यांनी निवडणक प्रचारादरम्यान भाजपने मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे सांगितले तसेच लोकसभा निवडणुकांतही सर्व ११ जागी भाजपचे उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. ६१ वर्षीय रमणसिंग यांनी प्रथम २००३ साली छत्तीसगढचे मुख्यमंत्री म्हणून ७ डिसेंबरला शपथ घेतली होती.

Leave a Comment