मिझोराम कॉंग्रेसकडेच, बहुमतासह २७ जागा

ऐझवाल – दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागलेल्या कॉंग्रेस पक्षाला मिझोरामच्या निवडणूक निकालांनी थोडासा दिलासा मिळाला आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने २७ जागा जिंकून दोन तृतीयांश बहुमतांसह सत्ता कायम राखली आहे. तर मिझोराम नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) पक्षाला चार जागा मिळाल्या आहेत.

चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे विद्यमान मुख्यमंत्री ललथनहवला यांनी सेरछिप व हरंगतुजरे या दोन्ही जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात आता विक्रमी पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे. दरम्यान निवडणूक रिंगणात उतरलेल्या ११ मंत्र्यांपैकी आठ मंत्र्यांनी विजय मिळविला आहे.

विधानसभा अध्यक्ष आर. रोमाविया यांनी प्रतिष्ठेच्या ऐजॉल नॉर्थमधून विजय मिळविला, मात्र पर्यटनमंत्री एस. हैलो यांना पराभवाचा सामना करावा लागला. कॉंग्रेसने २००८ मध्ये ३२ जागा जिंकल्या होत्या. मिझोराममधील निकालामुळे देशात प्रस्थापितांविरुद्ध लाटेने महत्वाची भूमिका बजावली असली तरी मिझोराममध्ये सुशासनाचा कॉंग्रेसला फायदा झाला, असे लालथनहावला यांनी सांगितले.