जोहान्सबर्ग – वर्णद्वेषाविरोधात सातत्याने लढा देणार्याख आणि आयुष्याची अनेक वर्षे तुरूंगवास भोगणार्यार द्र. आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांना म्हणजेच नेल्सन मंडेला यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जगभरातील सुमारे ९० देशांचे प्रमुख येथे जमले आहेत. भारतातर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे जोहान्सबर्गला गेले असून त्यांच्यासमवेत सोनिया गांधी, सुषमा स्वराज, आनंद शर्मा, सीताराम येचुरी आणि सतीश मिश्रा हेही आहेत.
जोहान्सबर्ग येथील फुटबॉल स्टेडियममध्ये मंडेला यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. येथे सर्वसामान्य नागरिकांनीही मोठी गर्दी केली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, अशा अनेक देशांचे प्रमुख या सभेसाठी उपस्थित राहात आहेत मात्र इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी अखेरच्या क्षणी आपली भेट रद्द केली आहे. या भेटीसाठी किमान १२ कोटी रूपये खर्च येणार असल्याने बेंजामिन येथे येणार नाहीत असे सांगितले जात आहे. करदात्यांचे ६ कोटी रूपये खर्च करून बेंजामिन यांनी स्वतःच्या तीन घरांची सजावट केल्यापासून त्यांच्यावर देशभरातून टिकेची झोड उठली आहे असे समजते.