नवी दिल्ली – दिल्लीच्या सत्तेतील कोंडी फुटण्याची शक्यता आहे. आगामी काळात म्हणजे २९ डिसेंबरपूर्वी भाजपने जनलोकपाल विधेयक मंजूर केल्यास आम आदमी पक्ष त्यांना समर्थन देऊ शकेल असे सांगत ‘आप’चे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण यांनी भाजपला पाठिंबा देण्याची दर्शवली आहे. मात्र हे पक्षाचे मत नसून माझे वैयक्तीक मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील सत्तेचा असलेला तिढा सुटेल असे वाटते.
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत ७० पैकी २८ जागांवर आम आदमी पक्ष, ३२ जागांवर भाजप व ८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे. सत्तेस्थापनेसाठी ३६ चा आकडा गाठावा लागेल. मात्र एकाही पक्षाला हा आकडा गाठता न आल्याने दिल्लीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’चे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीमध्ये भाजपला सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.
भाजपने २९ डिसेंबरपूर्वी जनलोकपाल आणि जनसभा घेण्याची मागणी मान्य केल्यास त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो असे सूचक वक्तव्य केले. मात्र हे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर ‘आप’च्या नेत्यांनीही भाजपला सशर्त पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली. तर भूषण यांनी आधी काश्मीर आणि कलम ३७० बद्दल त्यांची भूमिका मांडावी असे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे आता आगामी काळात भाजप या मुद़दयावर काय मत व्यक्त, करते याकडे लक्ष लागले आहे.