जनलोकपालसाठी आता ‘करेंगे या मरेंगे’

पारनेर – जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याचे आश्‍वासन देऊन सरकारने नंतर फसवणूक केली. गेली दोन वर्षे चर्चा तसेच आश्‍वासने फार झाली. जनलोकपाल विधेयक हिवाळी अधिवेशनात आणण्यासाठी मंगळवार दि. १० डिसेंबरपासून ‘करेंगे या मरेंगे’ असा लढा सुरू करू, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले. या उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार दयाल व जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी राळेगणसिद्धीस भेट देऊन आढावा घेतला.

या उपोषणापूर्वी राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ प्रभातफेरी काढणार आहेत. अण्णा हजारे हे प्रथम यादवबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पद्मावती बनातील महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून अण्णा हजारे सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संत यादवबाबा मंदिरात उपोषणास प्रारंभ करतील. याप्रसंगी सुरक्षेचे उपाय म्हणून शंभर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

आपण सुरू केलेल्या या लढ्याला जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असे म्हणून त्यांनी चार राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाशी नरेंद्र मोदी लाटेचा काहीही संबंध नसल्याचे प्रतिपादन केले.

Leave a Comment