सर्वच राजकीय पक्षांना धोक्यांचा इशारा

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने कॉंग्रेसचा पराभव केला असल्यामुळे कॉंग्रेसला आत्मपरीक्षण करावे लागत आहेच, परंतु आम आदमी पार्टीचा हा विषय सगळ्याच राजकीय पक्षांना विचार करायला लावणारा आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांना धोक्याचा इशारा देणारा आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी काल पत्रकारांशी बोलताना केले.

आम आदमी पार्टीचा विजय हा लोकशाहीला धोका आहे असे काही लोक मानत असले तरी आपल्याला तसे वाटत नाही. ही एक आपल्या लोकशाहीतली सकारात्मक घटना आहे, असे आपल्याला वाटते असे द्विवेदी म्हणाले. परंतु दिल्लीत भाजपा सत्तेत येऊ नये यासाठी कॉंग्रेस पक्ष आम आदमी पार्टीला पाठींबा देईल का, याबद्दल बोलण्यास त्यांनी नकार दिला.

चार राज्यातल्या निवडणुका ही लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले. राज्यातल्या निवडणुका स्थानिक प्रश्‍नावर होत असतात आणि लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रीय प्रश्‍नावर होत असतात. या दोन्हींचा असा संबंध जोडणे चूक आहे असे ते म्हणाले.

दिल्लीतल्या निवडणुकीत आपल्या पक्षातील तिकीट वाटपामुळे पराभव झाला, असे सांगतानाच त्यांनी पक्षात असलेली बजबजपुरी आणि एकवाक्यतेचा अभाव पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरला असे प्रतिपादन केले. राजस्थानमध्ये तर पक्षाचे कार्यकर्तेच नकारात्मक भूमिकेत होते. निवडणुकीच्या आधीच अनेक पक्ष कार्यकर्त्यांनी राजस्थानात कॉंग्रेसला ५० पेक्षाही जास्त जागा मिळणार नाहीत, असे भविष्य कथन केले होते. ही नकारात्मक भूमिका चुकीची आहे असे ते म्हणाले.