नवी दिल्ली – चार राज्यातल्या पराभवापासून कॉंग्रेसने धडा घेतला आहे आणि हा पक्ष आता जनतेशी अधिकाधिक कसा जोडला जाईल असा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. त्यासाठी आपण अधिकाधिक मेहनत करणार आहोत. पक्षात बदल घडविण्यासाठी आक्रमकपणे काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी चार राज्यातल्या निवडणूक निकालानंतर व्यक्त केली.
आम आदमी पार्टीने जनतेच्या अशा घटकांशी संपर्क साधला आहे की, ज्या घटकांशी साधारणत: राजकीय पक्ष कधीच संपर्क साधत नाहीत. आता आम्ही अशा घटकांशी इतका निकटचा संपर्क साधू की, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केले नसेल.
पक्षाला मजबूत केले पाहिजे असे माझे पहिल्यापासूनच मत आहे आणि आता मी पक्षामध्ये असा बदल करणार आहे की, ज्यात सामान्य कार्यकर्त्याचा आवाज ऐकला जाईल. जनतेने आम्हाला इशारा दिला आहे आणि असा इशारा विचारात घेऊन आपल्यात बदल करण्याची ताकद कॉंग्रेसमध्ये आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.