पोट निवडणुकीत जयललितांच्या पक्षाचा विजय

चेन्नई – तमिळनाडूमध्ये झालेल्या येरकौड (अनुसूचित जमाती राखीव) या विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीत सत्ताधारी अण्णा द्रमुकच्या उमेदवार पी. सरोजा यांनी द्रमुकचे उमेदवार व्ही. मारन यांचा ७८ हजार ११६ मतांनी दणदणीत पराभव केला. अण्णा द्रमुकचे आमदार सी. पेरूमल यांच्या निधनाने ही जागा रिकामी झाली होती. तिच्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत सी. पेरूमल यांच्या पत्नी पी. सरोजा यांना अण्णा द्रमुकने उभे केले होते.

पी. सरोजा यांना १ लाख ४२ हजार ७७१ मते मिळाली तर द्रमुकचे उमेदवार व्ही. मारन यांना ६४ हजार ६५५ मते मिळाली. आपल्याला कोणताही उमदेवार पसंत नाही हे सांगणारे एक बटन मतदान यंत्रावर होते. त्या बटनावर ४ हजार ४३० मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत विक्रमी ८९ टक्के मतदान झाले. त्यात अण्णा द्रमुकचा दणदणीत विजय झाल्यामुळे अधिक मतदान सत्ताधारी पक्षाला धोक्याचे असते या कल्पनेला धक्का बसला आहे.

२०११ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये अण्णा द्रमुकने सातत्याने चौथ्यांदा द्रमुकचा दारूण पराभव केला आहे. आजपर्यंत तिरुचिरापल्ली पश्‍चिम, शंकरन कोईल (अ.जा) आणि पुथुकोट्टाई या तीन पोटनिवडणुकांमध्ये अण्णा द्रमुकने द्रमुकला धूळ चारली आहे. चौथीही पोटनिवडणूक जिंकून जयललिता यांनी आपल्या पक्षाची लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

येरकौड मतदार संघातील ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी द्रमुकने नेते करुणानिधी यांचे चिरंजीव एम.के. स्टॅलिन आणि कन्या कनिमोळी यांनी बराच आटापिटा केला होता आणि ही निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधला होता. परंतु त्यांना अपयश आले. जयललिता यांनी या विजयाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, हा आपण जनतेसाठी राबविलेल्या धोरणांचा विजय असा असे मत व्यक्त केले.

Leave a Comment