रायपूर -मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आज छत्तिसगढमध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली. भाजपला या राज्यात काँग्रेसने चांगली लढत दिली. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर बराच वेळ विजयाचे पारडे काँग्रेसकडे झुकले होते. अखेर दुपारनंतर चित्र पालटले अन् भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यातील 49 जागा जिंकत भाजपने बहुमताचा जादुई आकडा पार केला. भाजपला अटीतटीची लढत देणार्या काँग्रेसने 40 जागा जिंकल्या. या राज्यात काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी केलेल्या महाभयंकर हल्ल्यात काँग्रेसचे काही महत्वाचे नेते मृत्युमुखी पडले होते. त्याची सहानुभूती काँग्रेसला मिळणार असल्याचे सुरूवातीचे चित्र होते.
या राज्याच्या नक्षलग्रस्त भागांमध्ये विधानसभेच्या एकूण 12 जागा आहेत. त्यातील 8 जागा काँग्रेसने जिंकत चांगली कामगिरी केली. मात्र, विजयासाठी ती पुरेशी ठरू शकली नाही. लो-प्रोफाईल राहून कार्य करणारे मुख्यमंत्री अशी रमणसिंह यांची ओळख आहे. त्यांनी दोन कार्यकाळांमध्ये राज्यात केलेल्या विकासकामांबद्दल नेहमीच गौरवोद्गार काढले जातात. त्यांची प्रतिमा आणि कार्य यांमुळेच भाजपचा विजय सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते. दरम्यान, विजयाच्या हॅट्ट्रिकबद्दल रमणसिंह यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. सलग तिसर्या विजयाचा हा दिवस ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.