अमेरिकेच्या अनेक भागांत थंडीचा कडाका वाढला असून त्यामुळे कॅलिफोर्नियात ४ जण ठार झाले आहेत. शिवाय रस्ते अपघातातही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक राज्यात वीज गायब झाली आहे तर बर्फवृष्टीमुळे रस्त्यावरची वाहतूकही ठप्प झाली आहे. शेकडो विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती आठवडाभर अशीच राहण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण डकोटा, मोंटाना राज्यात तुफान बर्फवृष्टी होत असून तपमान शून्याच्या खाली गेले आहे. मिनेसोटामध्येही असेच हवामान आहे तर टेक्सास पासून टेनेसी, व्हर्जिनिया पर्यंत हिमवादळाची शक्यता वर्तविली गेली आहे.
कॅलिफोर्नियात थंडीने चार जणांचा बळी घेतला आहे. बर्फामुळे रस्ते अपघातातही अनेक जण मरण पावले असून त्यांची नककी संख्या समजू शकलेली नाही. डलास येथे ७५ हजार घरांतील वीज गेली आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी सुमारे ४०० उड्डाणे रद्द केली गेली आहेत. त्यामुळे सुमारे ३ हजार प्रवाशांना विमानतळावरच रात्र काढावी लागली आहे असे समजते.