मोदींनी उडवली काँग्रेसची खिल्ली

नवी दिल्ली -भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर काँग्रेसची खिल्ली उडवली. काँग्रेसने चार राज्यांमध्ये मिळवलेल्या एकूण जागांची बेरीज भाजपने एकाच राज्यात मिळवलेल्या जागांपेक्षाही कमी भरते, असे मोदींनी म्हटले आहे. मोदींनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेसची खिल्ली उडवताना त्यांनी भाजपने मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांत 150 हून अधिक जागा मिळवल्याचा संदर्भ घेतला.

भाजपने चार राज्यांत मिळून 66 टक्के जागा मिळवल्या, तर काँग्रेसला केवळ 23 टक्के जागा मिळाल्या, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांत भाजपने केलेली कामगिरी नेत्रदीपक अशीच आहे. या निवडणुकांवेळी घेतलेल्या मेहनतीबद्दल मी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. विजयाबद्दल त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह आणि वसुंधरा राजे यांचेही अभिनंदन केले.

विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर मोदींनी विधानसभा निवडणुकांना सामोर्‍या जात असलेल्या सर्वच राज्यांत झंझावाती प्रचार केला. या निवडणुकांच्या निकालावरून मोदींच्या पुढील वाटचालीची झलक दिसू शकणार असल्याचे बोलले गेले. साहजिकच, निवडणुकांमधील घवघवीत यशाचे श्रेय मोदींना देण्यासाठी भाजपचे नेते पुढे सरसावले. पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह, माजी अध्यक्ष नितीन गडकरी, अरुण जेटली, गोपीनाथ मुंडे आदींनी भाजपच्या कामगिरीचे श्रेय मोदींना देऊन टाकले.