सर्वच बाबतीत उजवा असा… ‘पितृऋण’

सुधा मूर्ती यांच्या कन्नड भाषेतील ‘ऋण’ या कादंबरीवर बनलेला ‘पितृऋण’ नक्कीच बघायला हवा, असा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेते नितीश भारद्वाज (कृष्ण) यांनी दिग्दर्शनात केलेले पदार्पण सफल ठरले आहे. तर 1980 मधील ‘झाकोळ’नंतर आज ‘पितृऋण’द्वारे तनुजाने मराठी चित्रपटसृष्टीत केलेले पुनरागमन दखलपात्र आहे.

कथेबाबत थोडक्यात सांगायचे तर- व्यंकटेश कुलकर्णी (सचिन खेडेकर) या प्राध्यापकाची गाडी चालवताना एका सायकल चालवणार्‍या माणसाला धडक लागते आणि तो खाली पडतो, त्याला उचलायला प्राध्यापकाची मुलगी जाते… आणि… पडलेला माणूस हुबेहूब आपल्या बाबांसारखाच दिसत असल्याचे बघते. तसे बाबांना सांगते आणि त्याच्या मनात कुतूहल निर्माण होते. तो त्याला भेटायला गावात जातो. तेव्हा त्या व्यक्तीची विधवा आई श्राद्धाची तयारी करत असते. त्या व्यक्तीचे नावही व्यंकटेश कुलकर्णी असल्याचे कळल्यावर, फक्त वडिलांचे नाव वगळता बाकी सर्व नावे सारखीच असल्याने प्राध्यापक अस्वस्थ होतात. याबाबत ते त्या विधवा आईला विचारतात. तेव्हा ती आपले पूर्वायुष्य त्याला सांगते.

सेतू कुलकर्णी या व्यक्तीशी तिचा 50 वर्षांपूर्वी विवाह झालेला असतो. पण चारित्र्याच्या संशयावरून सेतू तिला सोडून निघून जातो. पुढे रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू होतो. पण विधवा आई भागीरथी हे सर्व सांगतानाच एका अंगठीचा उल्लेख करते आणि प्राध्यापक प्रचंड अस्वस्थ होतात. ते पुण्यातील मरण पावलेल्या वडिलांच्या बँक लॉकरचा ताबा घेतात आणि त्यांना तिथं अंगठी तेथे सापडते… मग… येथून मात्र सर्व रजत पडद्यावर पाहण्यासारखे.

उत्तम कथेतील काही संवाद कोकणी बाजाचे असले तरी ते पुस्तकी असल्याचे लक्षात येते. पण उत्तम कथेला सुंदर अभिनयाची जोड असल्याने याकडे लक्ष न देणे योग्य. चित्रपटातील ‘दयाघना’ गाणे उत्तम तर ‘मंतरलेल्या…’ गाण्याचा कथेला पुढे नेण्यासाठी उपयोग होतो. कौशल इनामदार यांचे संगीतही त्याला साजेसे आहे.
फक्त तनुजा, सचिन खेडेकर (डबल रोल), सुहास जोशी, विक्रम गोखले यांचाच नाही तर यातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय पाहण्यासारखा झाला आहे. यात नवतारका केतकी विलासही कमी पडत नाही.

आणि फक्त कलाकारांच्या अभिनयाबद्दलच नाही तर कोकणातील गाव, 50 वर्षांपूर्वीची पुण्यातील सदाशिव पेठ यांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल.
एकुणात एक उत्तम चित्रपट पाहिल्याचे समाधान देणारा असा हा ‘पितृऋण’ आहे.
निमिर्ती – इंडियन आय मॅजिक मोशन पिक्चर्स, दिग्दर्शक- नितीश भारद्वाज, कलाकार – तनुजा, सचिन खेडेकर, विक्रम गोखले, सुहास जोशी, मृणाल देशपांडे, केतकी विलास इ.
दर्जा – ***

Leave a Comment