वास्तव दाखविणारा – ‘थोडं तुझं थोडं माझं’

आजच्या जमान्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे माणसा-माणसातील संबंध दुरावल्यासारखे झाले आहेत. इंटरनेट, फेसबुकमुळे जग जवळ आलंय पण घराघरात जणू दुरावाच निर्माण झालाय. आणि बदलत्या काळानुसार आजच्या तरुण-पिढीची जीवनमूल्येही बदललेली आहेत. प्रत्येक पिढीची अशी स्वतःची जीवनमूल्ये काळानुसार ठरत असतात आणि त्यातूनच जुनी पिढी-नवी पिढी यांच्यात तणाव निर्माण होत असतो, हे वास्तव आहे. त्यामुळेच तर ‘आमच्यावेळी असं नव्हतं’ अशासारखी वाक्य कुठे ना कुठे कानावर पडत असतात. याच गोष्टीवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे ‘ए. के. फिल्म’च्या बॅनरखाली बनलेला अनिल काकडे दिग्दर्शित नुकताच प्रदर्शित झालेला ‘थोडं तुझं थोडं माझं’.

दादा (विक्रम गोखले), माई (सुलभा देशपांडे) यांचा मुलगा रमेश (अजिंक्य देव), सून मालती (वर्षा उसगांवकर) आणि या दोघांचा मुलगा समीर (निखिल काकडे) यांची ही कथा. आई-वडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे रमेश बिघडला आहे. मित्रांबरोबर पार्ट्या करणारा रमेश अशाच एका रेव्ह पार्टीत पोलिसांना सापडतो. तात्पुरत्या जामिनावर त्याची सुटका झाल्यावर त्याला दादा-माईंबरोबर गावाकडे पाठवले जाते.

कुटुंबाचे प्रमुख दादासाहेबांचे आपल्या गावाशी, परस्परांशी, संस्कारांची घट्ट नाते आहे. त्यांच्याच संस्कारात वाढलेला रमेशही तसाच असून, त्याला आपला मुलगा समीरकडूनही तीच अपेक्षा आहे. पण आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारा समीर त्याच्याच जगात मश्गुल असल्याने मार्ग चुकतो आणि… गावाकडे आजी-आजोबांबरोबर आल्यावर त्याला त्याच्या जगण्याचा योग्य मार्ग सापडतो… कसा… ते रजतपडद्यावरच पाहायला हवं.

दीपक भागवत, अनिल काकडे, राज कुबेर, नताशा पुनावाला यांनी ही कथा लिहिली असन, संवाद लिहिले आहेत कौस्तुभ सावरकर, नताशा पुनावाला, अभिजीत पेंढारकर यांनी. त्या त्या काळाचे संदर्भ वेगवेगळ्या प्रसंगात असल्याने चित्रपट मात्र कधी संथ चालतो तर कधी वेगही पकडतो. यातील पिढ्यांशी रिलेट करणारी गुरू ठाकूरचं गाणं, टर्बो-पारेकचं संगीत ठीक.

अभिनयाबाबत सांगायचे तर विक्रम गोखले, सुलभ देशपांडे, अजिंक्य देव, वर्षा उसगांवकर, अशोक समर्थ, पुष्कर जोग आपापल्या जागी योग्य ती कामगिरी पार पाडतात. नवे चेहरे निखिल काकडे, स्वरदा थिगळे यांना मिळालेल्या संधीचा फायदा पुढे होईल हे नक्की.
थोडक्यात ‘षंढयुग’ नंतर पंधरा वर्षांनी दिग्दर्शक अनिल काकडे यांनी आणलेला ‘थोडं तुझं थोडं माझं’ एकदा पाहायला काहीच हरकत नाही.

निर्मिती – ए. के. फिल्म्स, दिग्दर्शक – अनिल काकडे, कलाकार – विक्रम गोखले, सुलभा देशपांडे, अजिंक्य देव, वर्षा उसगांवकर, अशोक समर्थ, पुष्कर जोग, नवे चेहरे, निखिल काकडे, स्वरदा थिगळे.
दर्जा- **

Leave a Comment