मोदी बनाम राहुल

राहुल गांधी यांनी जेव्हा राजकारण सुरू केले तेव्हाच ते आमचे भावी पंतप्रधान आहेत अशा घोषणा कॉंग्रेसचे नेते देत होते आणि राहुल गांधी यांनीसुध्दा २०१४ सालची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवनू आपली तरुण कार्यकर्त्यांची वेगळी टीम उभी करायला सुरूवात केली होती. २०१४ साली या पदासाठी आपल्यासमोर लालकृष्ण अडवाणी हे उमेदवार असतील आणि त्यांच्या वृध्दत्वाशी राहुल गांधींच्या तारुण्याची तुलना करून अडवाणींना सहज पराभूत करता येईल अशी अटकळ कॉंग्रेसच्या नेत्यांनी बांधली होती. पण भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांची उमेदवारी एवढ्या जोरकसपणे पुढे आणली की राहुल गांधींना अक्षरशः माघार घ्यावी लागली. नरेंद्र मोदी यांचे वक्तृत्व आणि त्यांच्या वागण्याबोलण्यातला आत्मविश्‍वास यामुळे राहुल गांधी अक्षरशः फिके पडले. गेल्याच आठवड्यात केलेल्या एका पाहणीमध्ये ५९ टक्के मतदारांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली आणि राहुल गांधींच्या पारड्यात केवळ २२ टक्के मतदारांनी आपले मत टाकले. पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या किती पुढे आहेत हे या मतदानातून तर दिसून आले आहेच पण चार राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानेसुध्दा नरेंद्र मोंदीच्या प्रभावावर आणि राहुल गांधींच्या निस्तेजपणावर शिक्कामोर्तब केले आहे.

या निवडणुकांत राहुल गांधी विरुध्द नरेंद्र मोदी हा घटक निर्णाय ठरलेला आहे. परंतु त्यात राहुल गांधींचा पराभव झाल्यामुळे कॉंग्रेसचे नेते असा काही सामना झालाच नाही अशी सारवासारव करत आहेत. कॉंग्रेसचे नेते काहीही करोत आणि काहीही म्हणोत पण चार राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीत झालेला कॉंग्रेसचा पराभव हा राहुल गांधीचाच पराभव आहे आणि मिळालेला विजय हा नरेंद्र मोदी यांचाच विजय आहे. या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे कॉंग्रेसचे नेते ही लोकसभेची सेमीफायनल होती हेच मान्य करेनासे झाले आहेत. निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीतच नव्हे तर अगदी मतदारांच्या चाचण्या बाबतसुध्दा त्यांचे मत असेच होते. या चाचण्या आमच्या बाजूने असतील तर त्या खर्‍या पण आमच्या बाजूने नसतील तर त्या खोट्या असा त्यांचा खाक्या होता. आता ह्या निवडणुकीत विजय झाला असता तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी ही लोकसभेची सेमीफायनलच आहे असे ठामपणे सांगितले असते. पण ही सेमीफायनल हरल्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे, ‘छे! ही सेमीफायनल नव्हतीच, ५४२ जागांची सेमीफायनल ७०-८० जागांवर कशी होऊ शकेल,’ असा पवित्रा घेतला आहे.

त्यांनी काहीही पवित्रा घेतलेला असो पण जनतेने या निवडणुकीला लोकसभेची सेमीफायनल मानले होते आणि हा सामना मोदी विरुध्द राहुल गांधी आहे असा हेही लोकांनी गृहित धरले होते आणि या सामन्यात राहुल गांधी यांचा सपाटून पराभव झाला आहे. राहुल गांधींना त्याची सवय आहे. तामिळनाडू, बिहार आणि उत्तर प्रदेश या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये हिरीरीने उतरून त्यांनी असाच पराभव पत्करलेला आहे. या निवडणुका चार राज्यात झाल्या आणि त्या त्या राज्यातली सरकारे त्याच बरोबर तिथले प्रश्‍न यावर त्या प्रामुख्याने लढवल्या गेल्या हे नाकारता येत नाही परंतु या चारही राज्यात पंतप्रधानपदाचा उमेदवार हा समान मुद्दा होता. निदान लोकांनी तरी तो तसा मानलेला होता. असे असूनही राहुल गांधी हे कॉंग्रेसला विजय मिळवून देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती मान्य करण्याइतका प्रांजळपणा कॉंग्रेसच्या नेत्यांकडे नाही. त्यामागे कारणेसुध्दा आहेत. राहुल गांधींचे नेतृत्व अपयशी असले तरी त्यापेक्षा चांगले नेतृत्व कॉंग्रेसकडे आज तरी नाही. त्यामुळे आता कॉंग्रेसच्या नेत्यांची अवस्था आता तरी राहुल गांधींना पर्याय नाही अशी आहे मात्र हळूहळू पक्षामध्ये हा विचार बोलला जायला लागला आहे.

राहुल गांधींची अकार्यक्षमता आणि त्यांचा निवडणुकीतला सुमार प्रभाव हे दोष किती दिवस झाकून ठेवायचे हा प्रश्‍न विचारला जाणार आहे आणि विचारला गेला पाहिजे कारण कॉंग्रेसचे नेते नेहमी गांधी घराण्याला मानतात ते काही हे घराणे काही पुण्यवान आहे म्हणून मानत नाहीत ते त्यांना सत्ता मिळवून देते म्हणून मानतात. या घराण्याचा कोणी वारस आपल्याला सत्ता मिळवून देणार नाही. असे स्पष्ट व्हायला लागले तर हेच कॉंग्रेसचे नेते पर्याय नेतृत्व शोधल्या शिवाय राहणार नाहीत. किंबहुना तशी प्रक्रिया आता कॉंग्रेसमध्ये गतीमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चार राज्यातल्या निवडणुकांच्या निकालांनी कॉंग्रेसला हा धडा दिलेला आहे. कॉंग्रेसचे काही नेते धडा घ्यायला तयार नाहीत. ही गोष्ट त्यांच्यासाठी दुर्दैवाची आहे. कॉंग्रेसचा पराभव झाला असला तरी भाजपाचा निर्विवाद विजय कुठे झाला आहे. तेव्हा फार काळजी करण्याचे कारण नाही असे विश्‍लेषण हे लोक करत आहेत. एका परीने काही मर्यादेपर्यंत यात तथ्य आहे. दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचे यश म्हणावे तेवढे निर्विवाद नाही परंतु दिल्ली आणि राजस्थानमधला कॉंग्रेसचा पराभव फारच धक्कादाय आणि लाजिरवाणा आहे. दिल्लीत कॉंग्रेसला दोन आकडी संख्या आली नाही आणि राजस्थानमध्ये २०० जागांमध्ये ३० पेक्षा अधिक जागा मिळवता आलेल्या नाहीत. मध्य प्रदेशातही आपापसातले मतभेद मिटवून भाजपापुढे आव्हान उभे करता आलेले नाही. ही वस्तुस्थिती कॉंग्रेसचे नेते मान्य करणार आहेत की नाही? ते तशी मान्य करणार नसतील तर होणारे नुकसान त्यांचेच आहे. एकंदरीत कॉंग्रेसने आमूलाग्र विचार करावा असा संकेत त्यांना निवडणुकीतून मिळालेला आहे.

Leave a Comment