बंगळुरू : कर्नाटकाच्या दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील कुकेश्री या गावातल्या सुब्रमण्य मंदिरातील मडे स्नानाची प्रक्रिया अनेक सामाजिक संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर दरसाल प्रमाणेच सुरू झाली आहे. या रूढीमध्ये या मंदिरात ब्राह्मण भोजन घातले जाते आणि ब्राह्मणांनी खाऊन, उष्टावून टाकून दिलेल्या अन्नाच्या उष्ट्या पत्रावळी मंदिराच्या प्रदिक्षणा मार्गावर अंथरल्या जातात. नंतर भाविक मंडळी या पत्रावळीवरून लोळण घेतात आणि नजिकच्या नदीत जाऊन स्नान करतात.
या विधीमुळे चर्मरोग नष्ट होतात आणि निरामय आरोग्य प्राप्त होते असा लोकांचा समज आहे. परंतु ही घाणेरडी प्रथा बंद करावी अशी मागणी करून अनेक संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. यावर्षीही या विधीच्यावेळी मागासवर्गीय समाजातील तरुणांच्या अनेक संघटनांनी या मंदिराजवळ येऊन निदर्शने केली. या पत्रावळींवरून लोळण घेणार्या भाविकात मागासवर्गीय जातींच्या लोकांचा मोठा भरणा असतो.
संघटनांनी असा विरोध केला असला तरी या भाविकांचा ही रूढी पाळण्याबाबतचा आग्रह कायम आहे. त्यामुळे काहीवेळा या भाविकांनी निदर्शने करणार्या तरुणांना मारहाणसुध्दा केलेली आहे. या समाजातल्या एका धर्मगुरुंनी या रूढींच्या विरुध्द उपोषण सुरू केले. त्याचबरोबर काही संघटनांनी ही प्रथा बंद व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली.
कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रथेवर बंदी घातली होती. परंतु या मंदिराच्या पुजार्यांनी आणि भाविकांनी उच्च न्यायलयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात हरकत घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली मात्र या पत्रावळी केवळ ब्राह्मणांनीच खाऊन उरलेल्या असू नयेत तर सगळ्याच भाविकांनी खाऊन उरलेल्या पत्रावळी वापराव्यात असा आदेश दिला. त्यामुळे यंदा राज्य सरकारने या प्रथेमध्ये हस्तक्षेप केलेला नाही.