फारुख अब्दुल्ला यांचे प्रलाप आणि घूमजाव

नवी दिल्ली : महिलांच्या विनयभंगाचे आणि लैंगिक शोषणाचे एकेक प्रकरण पुढे येत असल्यामुळे त्यावर आपण शेरेबाजी करणे हे आवश्यकच आहे असे मानून केंद्रीय पर्यटन मंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी आपली जबान चालवली परंतु ती चालवताना विचार केला नाही. परिणामी तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर सारवासारव करत माङ्गी मागितली. काही गरज नसताना त्यांनी हे संकट ओढवून घेतले.

काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी महिलांनी दाखल केलेल्या या तक्रारींची खिल्ली उडविली. आजकाल एखाद्या मुलीशी किंवा महिलेशी बोलणे कठिण होऊन बसले आहे. बोलायला जावे तर कोणत्या क्षणी तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल हे सांगता येत नाही, असे ते म्हणाले. खरे म्हणजे एखाद्या बाईशी एखादा पुरुष बोलला की ती लगेच पोलिसात तक्रार करतेच असे काही नाही. परंतु फारुख अब्दुल्ला यांच्या म्हणण्यातून तसे ध्वनित होत होते. त्यामुळे त्यांच्या या प्रलापाची तीव्र प्रतिक्रिया उमटली.

ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मात्र फारुख अब्दुल्ला यांचे डोके ठिकाणावर आले की त्यांनी माङ्गी मागितली. अनेक महिला संघटनांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्याचबरोबर महिला अधिकार परिषदेच्या अध्यक्षांनी फारुख अब्दुल्ला यांचा निषेध केला. केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांनी फारुख अब्दुल्ला यांना आपली मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला. शेवटी आपण जे बोललो त्यामागे काही वाईट हेतू नव्हता असे म्हणून माफी मागितली.

Leave a Comment