जानेवारीपासून सर्व कारच्या किमती वाढणार

नवी दिल्ली – येत्या जानेवारीपासून बहुतेक सर्व कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती वाढणार असल्याचे जाहीर केले आहे. बीएमडब्ल्यू, ऑडी, होंडाने यापूर्वीच किमती वाढणार असल्याचे घोषित केले होते, त्या पाठोपाठ आता मारूती, हुंडाई, मर्सिडीज कंपन्यांनीही त्यांच्या गाड्यांच्या किमती वाढणार असल्याचे जाहीर केले आहे

ह्युंडाईचे मार्केटिंगचे उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव म्हणाले की सध्याचा बाजार, कर्ज व्याजदरातील वाढ आणि करावी लागत असलेली गुंतवणूक विचारात घेता गाड्यांच्या किमतीतीत वाढ अपरिहार्य आहे. ह्युंडाई २.८९ लाखांपासून ते २६.६९ लाख रूपये किमतीची कार मॉडेल्स विकते. मारूती सुझुकीनेही खर्चातील वाढीमुळे कारच्या किमती वाढविल्या जात असल्याचे सांगितले आहे.

कंपनीने आक्टोबरमध्येच त्यांच्या उत्पादनांच्या किमती १० हजारांनी वाढविल्या होत्या. त्यात आता अजून वाढ केली जाणार आहे.मर्सिडिजनेही त्यांच्या सर्व मॉडेल्समध्ये १० टक्के वाढ होत असल्याचे सांगितले आहे. कंपनी २२ लाख रूपयांपासून ते ३ कोटी रूपयांपर्यंतच्या किमतीतील गाड्या विक्री करते. होंडानेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांच्या मॉडेल्सच्या किमती वाढविल्या जात असल्याचे जाहीर केले आहे.