
नेल्सन मंडेला यांचे काल निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. आपल्या या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यातून जगातल्या अनेक नेत्यांनी प्रेरणा घेतली आहे. आङ्ग्रिकेत १९९४ पूर्वी राज्य करणार्या वर्णविद्वेषी राजवटीच्या कार्यकाळात ज्या अमेरिकेने नेल्सन मंडेला यांना दहशतवादी म्हटले त्याच अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर, नेल्सन मंडेला नसते तर बराक ओबामा झालाच नसता अशा शब्दात त्यांचा गौरव केला. नेल्सन मंडेला यांच्या निधनाने जगभरातल्या विविध देशातल्या वंचित समाज घटकांच्या सामाजिक न्यायासाठीच्या लढ्यामागची प्रेरणा नष्ट झाली आहे. भारतामध्ये अशाच प्रकारचा लढा देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशीच मंडेला यांचेही निधन व्हावे हा एक विलक्षण योगायोग आहे. मुळात नेल्सन मंडेला यांची प्रकृती ङ्गार मजबूत होती. कारण ते आपल्या कॉलेज जीवनामध्ये मुष्टीयोध्दे म्हणून प्रसिध्द होते. आयुष्यातली २७ वर्षे कारागृहाच्या कोठडीत राहूनसुध्दा अतीशय निकृष्ट जीवन जगूनसुध्दा त्यांची प्रकृती उत्तम राहिलेली होती. परंतु त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाने गाठले आणि आपल्या जीवनाच्या शेवटाचे एक दशक त्यांना कर्करोगाशी झुंज द्यावी लागली. अखेर काल त्यांचे निधन झाले.
त्यांचे निधन ही दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील एक दुःखद घटना आहेच यात काही शंका नाही. परंतु या माणसाचे थोरपण असे की त्यांच्या निधनाने सार्या जगामध्ये दुःख व्यक्त केले जात आहे. नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेतील गोर्या राजवटीचा अंत घडवून आणण्यासाठी प्रदीर्घ काळ तुरुंगवास सहन केला. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांचे नेतृत्व प्रस्थापित होत असतानाच्या काळातच त्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले आणि ते शेवटपर्यंत तुरुंगातच राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच त्यांनाही तुरुंगातून स्वातंत्र्य मिळाले. पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा २७ वर्षे तुरुंगात राहून लढवला, त्याला प्रेरणा दिली, नेतृत्व दिले. जगाच्या कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशा प्रकारचे नेतृत्व मिळालेले नाही. त्यांनी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतला होता. तसे ते फार गरीब नव्हते परंतु भारतीय समाज जीवनात ज्यांना वतनदार म्हटले जात होते अशापैकी कुटुंबात जन्मले होते. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून वकिलीची पदवी प्राप्त केलेली होती. परंतु जोहान्सबर्ग शहरामध्ये वकिली व्यवसाय करण्यासाठी आले तेव्हा त्यांना गोर्या राज्यकर्त्यांचा वर्णविद्वेष पदोपदी जाणवायला लागला.
तिथले काळे आफ्रिकन लोक मुळातले रहिवाशी असतानाही मूठभर गोरे लोक त्यांच्यावर राज्य करत होते. मोठ्या संख्येने असलेल्या मूळच्या कृष्णवर्णीयांना समुद्राच्या किनार्यावर भटकण्याची परवानगी नव्हती, त्यांच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश घेण्याची अनुमती नव्हती. एवढेच नव्हे तर गोर्यांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहातसुध्दा त्यांना प्रवेश नव्हता. या वागणुकीने मंडेलाचे बंडखोर मन पेटून उठले आणि त्यांनी आपल्या हक्कांचा लढा संघटित केला. नेल्सन मंडेला जन्मले त्याच्या काही वर्षे आधी महात्मा गांधी यांनी दक्षिण आङ्ग्रिकेतच गोर्या राज्यकर्त्यांच्या अशा वर्णविद्वेषी राजवटीविरुध्द लढा दिलेला होता. माणसाचा रंग गोरा आहे की काळा यावरून त्याचे श्रेष्ठत्त्व ठरत नाही तेव्हा कातडीच्या रंगावरून कोणाला तरी श्रेष्ठतेची वागणूक मिळावी आणि तोच रंग काळा आहे म्हणून कोणाला तरी पशू सारखी वागणूक मिळावी हा भेदभाव संपला पाहिजे यासाठी गांधीजी जवळ जवळ दीड दशक तिथे संघर्ष करत आले होते. नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधी यांना प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले नसले तरी दक्षिण आङ्ग्रिकेतल्या महात्मा गांधींच्या लढ्याच्या स्मृती त्यांन ऐकायला मिळत होत्या. त्यापासून स्ङ्गूर्ती घेऊन आपणही वर्णद्वेषी राजवटी विरुध्द लढले पाहिजे असे नेल्सन मंडेला यांना वाटायला लागले आणि त्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात त्यांनी झोकून दिले.
वयाच्या तिशीत त्यांनी आफ्रिकेतल्या ‘उमखोटो’ या संघटनेत प्रवेश केला. धारदार वक्तृत्व आणि सर्वस्व अर्पण करून काम करण्याची शैली यामुळे ते या क्रांतीकारी संघटनेचे प्रमुख झाले. इथिओपिया आणि अल्जेरिया या दोन देशामध्ये जाऊन त्यांनी घातपाती कारवायाचे शिक्षण घेतले मात्र ते शिक्षण घेऊन परतताच १९६२ साली त्यांना अटक करण्यात आली. त्यावर्षी त्यांच्यावर खटला चालून त्यांना पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ङ्गर्मावण्यात आली. ही शिक्षा सुरू असतानाच १९६४ साली त्यांच्यावर दुसरा खटला भरण्यात आला आणि त्यात त्यांना १८ वर्षाची शिक्षा झाली. या खटल्यांच्या दरम्यान त्यांना अनेकवेळा न्यायालयासमोर उभे केले जात असे आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची अनुमती दिली जात असे. ही प्रत्येक अनुमती त्यांनी संधी म्हणून वापरली आणि प्रत्येक वेळा देशातल्या तरुणांना विलक्षण स्ङ्गूर्ती देईल अशी भाषणेच ठोकली. देशातली विद्वेषी राजवट संपवणे हेच आपले जीवनध्येय आहे. त्यासाठी आपण प्राणसुध्दा द्यायला तयार आहोत असे त्यांनी प्रत्येकवेळा आवर्जुन सांगितले. त्यांच्यावर आणखीन एक तिसरा खटला चालला आणि त्यांना ९ वर्षांची शिक्षा झाली. त्यांचा तुरुंगवास हीच त्यांच्या देशातल्या तरुणांची प्रेरणा ठरली आणि १९९० साली त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. १९९३ साली मंडेला यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आणि दरम्यानच्या काळात वर्णविद्वेषी राजवटीची अखेर होऊन ९४ साली दक्षिण आङ्ग्रिकेतली पहिली मुक्त निवडणूक पार पडली. तिच्यात नेल्सन मंडेला म्हणून अध्यक्ष म्हणून निवडून आले. दरम्यान ते वृध्दत्वाकडे झुकत गेल्यामुळे त्यांना ङ्गार काळ सत्ता भोगता आली नाही परंतु त्यांनी दिलेल्या प्रखर लढ्याची प्रेरणा मात्र सार्या जगाला मिळाली.