रागाच्या भरात करिअरची माती

नितेश राणे यांनी गेली काही वर्षे सामाजिक कार्यात बर्‍यापैकी पुढाकार घेऊन अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रगतीपर वाटचाल करण्याची तयारी सुरू केलेली आहे. व्यवसायामध्ये एक गोष्ट सांगितली जाते. एक गिर्‍हाईक तयार करायला दहा-दहा वर्षे सेवा करावी लागते. पण तेच गिर्‍हाईक घालवायला मात्र एक क्षणसुद्धा लागत नाही. अर्थात व्यवसायातल्या या तत्वाचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. नेमकी हीच गोष्ट नितेश राणे यांच्या लक्षात आली नाही. गेल्या दहा-बारा वर्षात राजकारणात अनेक उपक्रम राबवून कष्टाने त्यांनी जे मिळवले ते सगळे पाच मिनिटात गमावले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या या पाच मिनिटांच्या कृत्याने आपल्या वडिलांच्या राजकीय प्रतिष्ठेवर सुद्धा मोठा ओरखडा काढला आहे. आता पाच मिनिटात त्यांनी जे काही गमावले ते परत मिळवायला त्यांना पुन्हा दहा-पंधरा वर्षे लागणार आहेत. सामान्य माणसाच्या जीवनातली वाटचाल तर अवघड असतेच, पण नेत्यांच्या जीवनातली वाटचाल सुद्धा अवघड असते. पदोपदी तोल सांभाळावा लागतो, संकटांना आणि प्रतिकूल प्रसंगांना मोठ्या धीराने तोंड द्यावे लागते. पण तिथे जो घसरतो तो राजकारणात पारच रसातळाला जातो.

नितेश राणे गोव्याला जात होते. मार्गावर टोल नाके असतातच. त्यातल्या गोव्यातल्या एका नाक्यावर ७५० रुपये टोलसाठी त्यांची गाडी अडवली गेली. तो त्यांनी नियमानुसार भरायलाच हवा होता पण त्याऐवजी त्यांचे बॉडीगार्ड गाडीतून उतरले आणि त्यांनी नाक्यावरच्या कारकुनांना मारायला सुरूवात केली. ही मारहाण एवढी जबर होती की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. शेवटी ते बॉडीगार्डच. त्यांचे कामचे ते आहे. महाराष्ट्रात अशी दादागिरी एकवेळ झाकून गेली असती पण गोव्यात पोलीस कारवाई झाली आणि महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्याचा मुलगा आपल्या वृथा स्वाभीमानाची किंमत मोजत तुरुंगात पडला. नितेेश राणे यांनी हा प्रताप महाराष्ट्रात गाजवला असता तर त्यामुळे राणे खानदानाची बदनामी झाली असती (अर्थात त्यांना तसे वाटत नाही. उलट कायद्याला धरून असलेला टोल निमूटपणे भरणे हाच त्यांना अपमान वाटतो आणि तसे करण्यात कमीपणा वाटतो पण आपण त्यालाच बदनामी म्हणतो). पण या सुपुत्राने परराज्यात जाऊन प्रताप गाजवल्याने ती महाराष्ट्राची बदनामी झाली. मंत्री होणे एकवेळ सोपे आहे पण एकदा अंगावर मंत्रीपदाच्या जबाबदारीची झुल चढली की स्वत:ला आणि आपल्या कुटुंबालाही वागण्या, बोलण्यातली एरवीची साहजिक अरेरावी सोडावी लागते.

सभ्यपणाची मर्यादा पाळावी लागते पण, ‘आधी होता पाग्या, त्याचा झाला वाघ्या. मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट र्‍हाईना’. अशी अवस्था व्हायला लागली की, स्वत:चीही ङ्गजिती होते आणि सरकारचीही अडचण होते. वागण्या बोलण्यातले तारतम्य सांभाळले नाही की अनेक संकटे समोर यायला लागतात. नितेश राणे यांनी स्थापन केलेल्या संघटनेचे नाव स्वाभीमानी संघटना आहे. माणसे सहजपणे आपल्या स्वभावानुसार वागत असतात. त्यांच्या नकळतपणे त्यांची मूळ प्रवृत्ती प्रकट होत असते. नितेश राणे यांना आपल्या संघटनेला सेवा संघटना असे नाव द्यावेसे वाटले नाही. कारण त्याच्या मनात स्वाभीमानाचे हेच स्वरूप प्रकटले होते. ते गोव्यातल्या या घटनेत त्याच्या नकळतपणे प्रकटले. या प्रकाराने हे सुपुत्र आपल्या बरोबर सतत बॉडीगार्डही बाळगत असतात हेही सर्वांना नव्यानेच कळले. टोल नाक्यावरील राड्याचा हा काही पहिला प्रकार नाही. महाराष्ट्रातल्या आमदारांना टोल मागितला की अशा काय मिरच्या झोंबतात हे काही समजत नाही. सर्वांना लागू असलेला नियम राजांनाही लागू असतो याचा आदर्श निर्माण करणार्‍या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर राजेंनी सारे नियम आधी पाळले पाहिजेत. पण त्यांना शिवाजी महाराज आचरणासाठी नको असतात तर केवळ मतांसाठी हवे असतात.

नितेश राणे यांनी आजवर अनेक संस्थांना देणग्या दिल्या आहेत. सामाजिक कार्यावर करोडो रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणातल्या पुढच्या प्रगतीची चर्चा सुरू झाली होती पण केवळ ७५० रुपयांसाठी त्यांनी सारी राजकीय करीअर पणाला लावली. आज त्यांची समाजात काय पत राहिली असेल ? हा प्रकार घडला तेव्हा अनेकांनी त्यांचे विश्‍लेषण केले आणि नितेश राणे यांनी केवळ स्वत:च्याच नाही तर मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहणार्‍या आपल्या वडलांच्याही करीअरवर प्रश्‍नचिन्ह लावले आहे असे प्रतिपादन केले. ही गोष्ट खरी आहे. पण नारायण राणे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावर प्रश्‍नचिन्ह लावण्याचा भार एकट्या चिरंजीवावर पडू नये म्हणून स्वत:ही त्यासाठी सक्रिय प्रयत्न केले. मुलाने टोल नाक्यावर राडा केला तर पिताजींनी ंमत्रिमंडळाच्या बैठकीत राडा केला. पश्‍चिम घाटातल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कोकणातली काही गावे आरक्षित केल्याचा राग मनात ठेवून त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वन मंत्री पतंगराव कदम यांनाच ङ्गैलावर घेतले आणि अशी आपली गोची होणार असेल तर आपल्याला या मंत्रिमंडळात रहायचे नाही असे म्हणून त्यांनी मंत्रिपदाचा त्याग करण्याची तयारी दाखवली.

टोल नाक्यावरचा राडा मुलाने केलाय म्हणून त्याची सजा नारायण राणे यांना कोणी दिली असतीच असे नाही पण नारायण राणे यांना तेवढीही कसर बाकी ठेवायची नव्हती म्हणून त्यांनी हा राडा केला. त्यांचीही ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत राडा करण्याची पहिली वेळ नाही. पूर्वीही एकदा त्यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राडा केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीसमोर काही वादग्रस्त प्रस्ताव येऊ शकतात. पण त्यातला एखादा प्रस्ताव आपल्या मनासारखा नसला तरी शांतपणे आपले त्यावरचे मत मांडता येते. मात्र त्याऐवजी राडाच घातला तर मुद्दाही बाजूला रहातो आणि आपल्या करीअरवरही कलंक लागतो पण हे रागाने बेभान होण्याची सवय असणारांना आणि त्यातच स्वाभीमान मानणार्‍यांना सांगणार कोण ?

Leave a Comment