मोदींच्या मुंबईतील रॅलीला १० हजार चहावाले येणार

मुंबई – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस पक्षाने चहा विकणारा म्हणून केलेला पाणउतारा लक्षात ठेवून या अपमानाला प्रत्युत्तर देण्याचा अनोखा मार्ग भाजपने निवडला आहे. येत्या २२ डिसेंबरला मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत असलेल्या मोदींच्या भव्य रॅलीला मुंबईतील १० हजार चहावाल्यांना सन्मानाने निमंत्रण दिले जाणार आहे.

पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना मुंबईच्या गल्लीबोळात, रेल्वे स्थानके, बसस्टॅड तसेच रात्री सायकलवर फिरून चहा विकणारे जे चहावाले आहेत त्यांच्या गाठीभेटी घेण्याच्या सूचना दिल्या असून या सर्वांना मोदींच्या सभेत सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यास सांगितले आहे. सभेसाठी या चहावाल्यांना आणणे व नेण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहेच पण व्यासपीठाच्या भोवताली त्यांची बसण्याची खास व्यवस्थाही केली जाणार आहे असे समजते.

काँग्रेसने मोदींचा चहावाला असे म्हणून अपमान केला आहे मात्र चहावालाही पंतप्रधानपदाचा उमेदवार बनू शकतो आणि हे फक्त भाजप मध्येच शक्य आहे असे पक्षाचे म्हणणे आहे. या सभेला २० हजार कॉलेज विद्यार्थ्यांना आणण्याचेही प्रयत्न सुरू असून प्रत्येक कॉलेजात संपर्क साधला जात आहे. पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोदींची ही सभा होत आहे.या रॅलीतच भाजप लोकसभा निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकणार आहे.

या रॅलीला राज्यभरातील कार्यकर्त्यांना हजर राहता यावे यासाठी २० रेल्वे. २० हजार खासगी गाड्या आणि बस बुक केल्या गेल्या आहेत असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment