पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचा दशकात लागेल शोध

पृथ्वीबाहेरही अंतरिक्षात कुठेतरी जीवसृष्टी असावी असा अंदाज आणि अपेक्षा शास्त्रज्ञ नेहमीच वर्तवित असतात. अनेकवेळा परग्रहवासी पृथ्वीवर आले असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. उडत्या तबकड्या पाहिल्याच्या हकीकती वारंवार चर्चेत येतात. पृथ्वीबाहेर खरोखरच जीवसृष्टी आहे का याचे निश्चित उत्तर येत्या दशकात मिळेल असा विश्वास हाऊस कमिटी ऑन सायन्स, स्पेस, टेक्नॉलॉजी समोर सारा सीगर या अॅस्ट्रोबायोलॉजरनी व्यक्त केला आहे. सारा एमआयटी मध्ये फिजिक्स आणि प्लॅनेटरी सायन्सच्या प्रोफेसर आहेत.

त्या म्हणाल्या की अमेरिका अवकाश संशोधन क्षेत्रात खूपच प्रगत असून अंतराळातही मानव असावेत का या संशोधनाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचली आहे. नासाच्या केप्लर दुर्बीणीने सूर्यासारखे २० टक्के तारे टिपले आहेत व या तार्‍यांभोवती पृथ्वीसारखे ग्रहही दिसले आहेत. आपल्या सौरमंडळाबाहेरही जीवन असू शकते असा ठाम दावा यामुळे करणे शक्य झाले आहे. २०१८ सालात लोंच होत असलेली जेम्स वेब स्पेस दुर्बीण या संबंधीचे आणखी पुरावे देईल तसेच या ग्रहांचे वातावरणही तपासू शकेल. मात्र तेथे प्रत्यक्ष जीवसृष्टी असेल तर त्याची माहिती मिळविण्यासाठी जेम्सवेब पेक्षा अधिक क्षमतेची दुर्बीण आवश्यक आहे. एकदा ही दुर्बीण बनली की जीवसृष्टीचे खात्रीलायक पुरावेच हाती येतील असाही सीगर यांचा दावा आहे.

Leave a Comment