नऊ राज्यांमध्ये 58 दिवस फिरला नारायण साई

सूरत- बलात्काराच्या आरोप असलेला व स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा पुत्र नारायण साई अटक टाळण्यासाठी नऊ राज्यांमध्ये फिरत राहिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नारायण साई याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. तब्बल 58 दिवसानंतर पंजाब सीमेवर त्याला अटक करण्यात आली.

नऊ राज्यांमध्ये त्याने 55 ठिकाणी बदलली आहेत. दिवसाला तो तीन-चार ठिकाणे बदलत असे. अनेक वेळा तो ढाब्यांवर झोपत असे. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने वेशभूषा बदलली होती. अटक करण्यापूर्वी त्याने तीन वेळा नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

नारायण साईला अटक करण्यासाठी त्याचा पूर्वीचा मोटार चालक व सुरक्षा रक्षकाने पोलिसांना मदत केली. सतीश वाधवानी यांनी इंदूर पोलिसांना त्याच्या ठिकाणांबद्दल माहिती दिली होती. नारायण साईला अटक केल्यानंतर त्याच्या मोटारीमध्ये काही रक्कमेसह लैंगिक क्षमता वाढविणार्‍या गोळ्या आढळून आल्या आहेत.