दिल्ली निवडणूक – महिला मतदार गेमचेंजर ?

दिल्ली – दिल्ली विधानसभेसाठी नुकत्याच पार पडलेल्या मतदानानंतर एक्झिट पोलचे अंदाज कांहीही येत असले तरी महिला मतदार या निकालात राजकीय पक्षांसाठी गेमचेंजर ठरतील असा अंदाज वर्तविला जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या निवडणुकांत महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले असून त्यात तरूणी, गृहिणी, प्रोफेशनल आणि वृद्ध महिलांचाही समावेश आहे. यंदाच्या मतदानात महिला मतदारांची टक्केवारी ६५.१७ आहे. या निवडणुकीसाठी ३४ लाख ६० हजार महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

अनेक विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांनी पुरूषांच्या संख्येच्या बरोबरीने मतदान केले आहे तर राजेंद्रनगर, दिल्ली कन्टोन्मेंट, मोतीनगर, पालम, किरारी, छत्तरपूर येथे मतदान करणार्‍यांत महिला मतदारांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक होती. त्यामुळे भाजप, काँग्रेस आणि प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या आम आदमी पार्टीचे भवितव्य महिलाच ठरविणार हे नक्की झाले आहे. २००८ सालच्या निवडणुकांत ५६.६२ टकके महिलांनी मतदान केले होते. यंदा त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. महागाई, सुरक्षा आणि सिक्युरिटी हे महिलांसाठी या निवडणकीत महत्त्वाचे मुद्दे होते.

Leave a Comment