तेजपाल यांच्याविरोधाताला खटला जलदगती न्यायालयात चालणार

पणजी- तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. आगामी काळात त्यांच्याविरोधातला खटला जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत विचार सुरू आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने ज्यांच्याशी संपर्क साधला ते तीनजण शुक्रवारी साक्षीसाठी गोवा न्यायालयासमोर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी तेजपाल यांची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपणार आहे.

दरम्यान, गोवा येथील हॉटेलमधील प्रकार हा महिला पत्रकार आणि आपल्यामध्ये सहमतीने घडल्याचा दावा तेजपाल याने केला आहे. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांना योग्य तो न्याय मिळेल,असा विश्वास पर्रिकर यांनी केला. तेजपाल यांच्याविरोधातील खटल्यावर परिणाम होणार नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपांचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील हॉटेलच्या लिफ्टमध्ये घडलेल्या घटनेनंतर पीडित तरुणीने ज्या तिघांना त्याबद्दल सांगितले, त्या तिघांची शुक्रवारी गोवा न्यायालयासमोर साक्ष होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी पणजी येथे दिली. तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी यांनाही गोवा पोलिसांनी न्यायालयासमोर साक्ष देण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे त्यांनाही निवेदन सादर करण्यासाठी यावे लागणार आहे.