एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसाठी राज ठाकरेंनी पुकारला एल्गार

मुंबई – एसटी कर्मचार्‍यांची स्थिती सुधारण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. साडेसतरा टक्के प्रवासी कर रद्द करावा, अशी मागणी करणारं पत्र राज यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

एसटी कामगार कमी वेतनश्रेणीत काम करत आहेत. त्यांची वेतनश्रेणी सुधारावी यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी यात करण्यात आली आहे. एसटी कामगारांच्या मागण्यांकडे सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर कामगारांच्या संतापाचा उद्रेक राज्यभर होईल असा इशाराही राज यांनी पत्रातून दिला आहे. मुख्यमंत्र्यांनीही राज यांच्या या पत्राची गांभीर्याने दखल घेतल्याचे मनसे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले आहे.