राजदच्या माजी खासदाराला जन्मठेप

पाटणा- संयुक्त जनता दल पक्षाचे नेते सत्येंद्र सिंह यांची हत्या केल्याच्या आरोपावरून येथील न्यायालयाने आज राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार विजयकृष्णा आणि त्यांच्या तीन साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्या प्रकरणात विजय कृष्णा, त्यांचे चिरंजीव आणि अन्य दोघांना न्यायालयाने सोमवारी दोषी घोषित केले होते. त्यांची शिक्षा आज जाहीर करण्यात आली.

सन 2009 मध्ये संयुक्त जनता दलाचे नेते सत्येंद्र सिंह यांचा मृतदेह एका बंद लोखंडी पेटीत गंगा नदीत फेकून दिल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर केलेल्या तपासात विजयकृष्णा आणि त्यांच्या साथीदाराचा यात हात असल्याची बाब समोर आली होती. कृष्णा यांनी सन 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बरहा मतदारसंघात संयुक्त जनता दलाचे नेते व सध्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यंाचा पराभव केला होता. सध्या ते राष्ट्रीय जनता दल पक्षाचे, राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून काम पाहात आहेत.

Leave a Comment