नौदलाची प्रचंड तयारी

हिंदू धर्मात मध्य युगामध्ये समुद्र पर्यटनाला बंदी घालण्यात आली होती. समुद्र ओलांडून दुसर्‍या देशात जाणे हे मोठे पाप समजले जात होते. त्यामुळे भारतीयांचा व्यापार, धर्मप्रसार यांना मोठा अटकाव झाला होता. समुद्र ओलांडायचाच नसल्यामुळे जहाजे तयार करण्याच्या बाबतीत आपण कधी पुढाकार घेतलाच नाही आणि त्यावर संशोधनही केले नाही. याच काळात यूरोप खंडात मात्र जहाजांच्या बांधणीत मोठे संशोधन झाले आणि साहसी यूरोपीय दर्यावर्दींनी समुद्रातून प्रवास करून जग पादाक्रांत केले. ब्रिटीशांचे नौदल हे जगात सर्वात श्रेष्ठ मानले जात असे आणि त्या श्रेष्ठत्वाच्या जोरावरच ब्रिटिशांनी भारतावर आक्रमणे करून भारताला जिंकले आणि गुलाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशातली ही कमतरता विचारात घेऊन समुद्रावर सुध्दा वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाचा इतिहास विजयदुर्ग किल्ल्याच्या रुपाने आपल्या समोर सतत उभा असतो. आपण मध्य युगातली ही कमतरता विसरून आता जगातले सर्वश्रेष्ठ नौदल उभे करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांची माहिती जगाला कळावी आणि आपल्याही देशातल्या लोकांना या क्षेत्रात आपण नेमके कोठे आहोत हे समजावे म्हणून काल भारतात नौदल दिन साजरा करण्यात आला.

युध्दामध्ये पायदल आणि हवाईदल यांच्या कामगिरीची नेहमीच प्रशंसा होत असते. मात्र तुलनेने नौदल हे दुर्लक्षित राहते. म्हणून तरुण पिढीसमोर भारतीय नौदलाच्या कामगिरीचा आढावा सादर करण्याची गरज आहे. त्यासाठी काल भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आला. हा दिवस ४ डिसेंबरला का पाळला जातो हे बर्‍याच लोकांना माहीत नाही. खरे म्हणजे तो इतिहास काही ङ्गार जुना नाही. १९७१ साली नौदलाने मोठा अचाट पराक्रम गाजवला. म्हणून ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून पाळला जातो. त्यावेळी भारत आणि बांगला देशाच्या सीमेवर भारत-पाकिस्तान युध्द सुरू होते. त्यावेळी बांगला देशाचा जन्म झालेला नव्हता. पण त्याचसाठी युध्द सुरू होते. भारताला पाकिस्तानशी लढायचे असेल तर पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन्ही आघाड्यांवर लढावे लागणार होते. पाकिस्ताननेही तशी तयारी केली होती आणि भारतानेसुध्दा तोडीस तोड तयारी केली होती. मात्र आपल्या तयारीचा गर्व बाळगणार्‍या पाकिस्तानचे लष्करी अधिकारी दोन आघाड्यांवरच्या तयारीवर मनातून खूष होते आणि समाधानीही होते. त्याचवेळी भारताच्या आयएनएस विक्रांत या बोटीच्या मदतीने भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करून स्वतःच ितसरी आघाडी उघडली.

ती उघडली नसती तरी दोन आघाड्यांवर पाकिस्तानचा पराभव करण्यास भारतीय सैन्य सक्षम होते परंतु भारताने तिसरी आघाडी उघडून पाकिस्तानची दोन आघाड्यांवरील मुळातच अपुरी असलेली शक्ती तीन आघाड्यांवर विभाजित झाली आणि केवळ दहा बारा दिवसात पाकिस्तान पराभूत झाले. तिसरी आघाडी उघडण्याची ही नौदलाच भूमिका त्यावेळी निर्णायक ठरली होती. म्हणून चार डिसेंबर हा दिवस भारतात नौदल दिवस म्हणून साजर केला जातो. आयएनएस विक्रांत या बोटीला भारतीय लष्कराच्या इतिहासात असे मानाचे स्थान आहे. परंतु ही नौका एक स्मारक म्हणून जतन करण्यास भारत सरकार तयार नाही. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. या बोटीचे जतन केल्यास पुढच्या पिढ्यांना तिच्या पराक्रमाची आठवण होईल आणि आपल्या देशाविषयी अभिमान वाटेल. तेव्हा सरकारने हे जतन करणे गरजेचे आहे. सध्या भारताचे नौदल जगातले एक सामर्थ्यशाली नौदल ठरलेेले आहे आणि भारताला तशी आवश्यकता आहे. कारण भारताच्या पूर्व, पश्‍चिम आणि दक्षिण अशा तीन दिशांनी समुद्र आहे. भारताला लाभलेला प्रचंड मोठा समुद्र किनारा हे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसमोरचे एक मोठे आव्हान आहे. परंतु भारताच्या नौदलाची तयारीसुध्दा तशीच आहे. भारताच्या नौदलात नुकतीच दाखल झालेली ‘विक्रमादित्य’ ही युध्दनौका भारताच्या लष्करी सिध्दतेतले एक मोठे पाऊल ठरली आहे.

गेल्या १६ तारखेला रशियात बांधलेली ही अजस्र नौका भारताच्या नौदलात सामील झाली. ती भारताच्या नौदलातली सर्वाधिक शक्तिशाली सुसज्ज युध्दनौका आहे. भारताच्या नौदलात ‘विराट’ ही युध्द नौका सर्वाधिक सुसज्ज आणि मोठी समजली जात असे. मात्र ती आता मागे पडली आहे. कारण विराट ही २८ हजार टन वजनाची युध्दनौका आहे तर विक्रमादित्य ही ४४ हजार ५०० टन वजनाची आहे. ती २८४ मीटर लांबीची असून तिच्यावरून ‘मीग २९’ हे लढाऊ विमान, ‘कामोव ३१’ आणि ‘कामोव २८’ या दोन जातींची लढाऊ हेलिकॉप्टर्स उड्डाण घेऊ शकतात. विशेष म्हणजे तिच्याशी पाणबुड्या विरोधी यंत्रणाही निगडित आहे. तिच्यामुळे भारताची युध्दसज्जता वाढली आहे. भारत आणि रशिया यांच्या सहकार्यातूनच ‘ब्रह्मोस’ हे जगातले सर्वात वेगवान आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित झालेले आहे. ते क्षेपणास्त्र भारतीय नौदलातच दाखल झालेले आहे. भारताने क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. पृथ्वी, धनुष, अग्नी अशी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची मालिकाच तयार केलेली आहे. या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या भारतीय नौदलात घेतल्या जातात आणि त्यातली बरीच क्षेपणास्त्रे नौदलातच दाखल झालेली आहेत. सध्या मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये भारतीय युध्दनौकांची निर्मिती केली जाते आणि बॉम्बे डॉकयार्डमध्ये दुरूस्तीचे काम चालते. या दोन्ही डॉकयार्डना २७८ वर्षांची परंपरा आहे. विशाखापट्टणम येथेही युध्द नौका बांधल्या जातात. सध्या भारतीय नौदलात ४५ युध्द नौका बांधण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment